
लातूर, 20 सप्टेंबर (हिं.स.)।
: गेल्या सात दिवसांपासून उदगीर शहरात मोठ्या उत्साहात व थाटामाटात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता आज गणेश विसर्जनाने होत आहे. शहरातील विविध गणेश मंडळांच्या गणरायांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली असून, भक्तिमय वातावरणात गणेशभक्त निरोप देत आहेत.
उदगीरचे मानाचे समजले जाणारे आजोबा गणपती यांच्या महाआरतीने विसर्जन सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार संजय बनसोडे, जिल्हाधिकारी बाष्ठेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत आजोबा गणपतीची विधिवत महाआरती करण्यात आली. त्यानंतर विसर्जनाचा श्रीफळ फोडून गणेश विसर्जनाला प्रारंभ करण्यात आला.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिरवणुका शांततेत व सुरळीत पार पडाव्यात, यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, उदगीर नगरपरिषद प्रशासनानेही विसर्जनासाठी जय्यत तयारी केली असून विसर्जनस्थळी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गणेश मंडळांच्या मिरवणुका नियोजित मार्गाने सुरळीतपणे पार पडाव्यात आणि गणेशभक्तांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. शहरात उत्साह, भक्ती आणि जल्लोषाचे वातावरण असून, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गणरायाला निरोप देण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis