शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत व सरसकट कर्जमाफी द्यावी : हर्षवर्धन सकपाळ
मुंबई, 20 सप्टेंबर (हिं.स.) - मागील ४०-४५ दिवसापासून पावसाने खंड दिला असून पीकं करपून गेली आहेत. दुष्काळ पडलेला असताना सरकार मात्र बैठका व चर्चा यात वेळ मारून नेत आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पहात आहे, असा संतप्त प्र
हर्षवर्धन सकपाळ दुष्काळ दौरा


हर्षवर्धन सकपाळ दुष्काळ दौरा


मुंबई, 20 सप्टेंबर (हिं.स.) - मागील ४०-४५ दिवसापासून पावसाने खंड दिला असून पीकं करपून गेली आहेत. दुष्काळ पडलेला असताना सरकार मात्र बैठका व चर्चा यात वेळ मारून नेत आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पहात आहे, असा संतप्त प्रश्न विचारून अस्मानी व सुलतानी संकटात असलेल्या बळीराजाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, हेक्टरी १ लाख रुपये मदत व सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की, शेतीची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे, शेतकरी संकटात आहे, बुलढाणा जिल्ह्यातील एका तरूण शेतकऱ्याने त्याचे २० एकर सोयाबीन मोडीत काढण्याचा निर्णय घेतला. या शेतकऱ्याने मुख्यमंत्री व मंत्र्यांनाही आपल्या शेताची अवस्था पाहण्यास या, अशी आर्त विनंती केली होती पण कोणीही या शेतकऱ्याकडे फिरकले नाही. कृषीमंत्री बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते पण तेही फिरकले नाहीत. महायुती सरकार हे आंघळं, बहिरं व मुकं सरकार आहे. शेतकरी सरकारकडे मायबाप म्हणून आशेने पहात असते पण या सरकारला त्यांचे काहीही पडलेले नाही. या शेतकऱ्याचे सांत्वन करणे हे माझे कर्तव्य आहे म्हणून मी या शेतकऱ्याची भेट घेतली. दुष्काळ हा राजकारण करण्याचा विषय नाही याचे भान आम्हाला आहे, पण सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे पण तसे होताना दिसत नाही.

राज्यातील शेतकऱ्याची अवस्था अत्यंत बिकट आहे त्यांना तातडीने मदतीची गरज आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर बोलावलेल्या बैठकीत काजू बदामवर सत्ताधारी पक्षाचे खासदार ताव मारत आहेत, सरकारकडे संवेदनाच नाहीत. बळीराजाला तात्काळ मदत मिळावी यासाठी काँग्रेस पक्ष सत्याग्रह करत आहे, काँग्रेसचे कार्यकर्ते गावोगावी आंदोलन करत आहेत, सरकारने तातडीने मदत जाहीर केली नाही तर मंत्री व सत्ताधारी पक्षाच्या आमदार खासदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही, याचा पुनरुच्चार सपकाळ यांनी केला.

महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी फसवी आहे, बुलढाणा जिल्ह्यातील या गावात कर्जमाफीच्या पहिल्या यादीत दोन शेतकऱ्याची नावे होती तर दुसऱ्या यादीत एका शेतकऱ्याचे नाव आहे, या शेतकऱ्याला फक्त ४० हजार रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. सरकारचे दावे व वस्तुस्थिती यात मोठा फरक आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखाची आहे पण शेतकऱ्यांनी हवालदिल होऊ नये, आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहनही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande