वर्धा : खापरी येथे गोठ्यात बांधलेल्या दोन शेळ्यांचा पाडला फडशा
वर्धा, 20 सप्टेंबर (हिं.स.) सेलू तालुक्यात वन्यजीवांचा आणि हिंसक पशूंचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला असून, शेतकरी वर्गासमोर मोठे उभे संकट ठाकले आहे. खापरी मुंगापूर येथील शेतात रात्रीच्या सुमारास बिबट्याने धुमाकूळ घालून एकाच गोठ्यातील एका शेळीच्या
खापरी येथे गोठ्यात बांधलेल्या दोन शेळ्यांचा पाडला फडशा


वर्धा, 20 सप्टेंबर (हिं.स.)

सेलू तालुक्यात वन्यजीवांचा आणि हिंसक पशूंचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला असून, शेतकरी वर्गासमोर मोठे उभे संकट ठाकले आहे. खापरी मुंगापूर येथील शेतात रात्रीच्या सुमारास बिबट्याने धुमाकूळ घालून एकाच गोठ्यातील एका शेळीच्या व एका बोकडाचा फडशा पाडल्याची घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील खापरी सेलू रोड लगत पुरुषोत्तम वैद्य यांचे शेत आहे. या शेतातील गोठ्यात त्यांच्या मालकीची एक शेळी आणि एक बोकड बांधण्यात आले होते. आज पहाटेच्या सुमारास बिबट्याने गोठ्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात गोठ्यात बांधलेल्या दोन्ही शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी शेतकरी पुरुषोत्तम वैद्य हे नेहमीप्रमाणे शेतात गेले असता, गोठ्यातील हा भयानक प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी याची माहिती गावकऱ्यांना व वनविभागाला दिली. वनरक्षक छाया पेटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ऐन हंगामात झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. परिसरात दररोज कुठे ना कुठे घडत असलेल्या घटनेमुळे खापरी परिसरासह संपूर्ण सेलू तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. खापरी गावात बिबट्याचा वावर आणि हल्ला सतत वाढताना दिसून येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. केवळ बिबट्याच नव्हे, तर गावात वानरांचा त्रासही मोठ्या प्रमाणावर वाढला असून यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. जीव मुठीत धरून जगावे लागत असल्यामुळे शेतमजूर व शेतकरी आता शेतातील कामावर जाण्यास धजावत आहे. शेतीची कामे खोळंबली असून याचा थेट परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी व वन्यजीवांच्या बंदोबस्तासाठी प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलत रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी खापरी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande