शिरोलीतील गणेश विसर्जन मिरवणूकीला वादाचे आणि अंधाराचे गालबोट
कोल्हापूर, 20 सप्टेंबर (हिं.स.)। शिरोली पुलाची, तालुका हातकणंगले गावातील गणेशोत्सव मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला वादाचे आणि अंधाराचे गालबोट लागले. विसर्जन मिरवणुकीसाठी काही मंडळांनी आणलेल्या साऊंड सिस्टिमचा आवाज वाढल्याने पोलिसांनी हस्तक्षेप के
शिरोलीतील गणेश विसर्जन


कोल्हापूर, 20 सप्टेंबर (हिं.स.)। शिरोली पुलाची, तालुका हातकणंगले गावातील गणेशोत्सव मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला वादाचे आणि अंधाराचे गालबोट लागले. विसर्जन मिरवणुकीसाठी काही मंडळांनी आणलेल्या साऊंड सिस्टिमचा आवाज वाढल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला. यातून वाद निर्माण झाला याबरोबरच उंच अशा लाईट आणि साऊंड सिस्टिमच्या स्ट्रक्चरला विजेच्या तारांचे अडथळे होऊ नये यासाठी मिरवणूक मार्गावरील पर्यायाने संपूर्ण गावातीलच वीजपुरवठा तब्बल सहा तास खंडित करण्यात आला. यामुळे सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागला.

शिरोली पुलाची गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची विसर्जन मिरवणूक सायंकाळ नंतर सुरू झाली. पोलिसांनी सूचना देऊनही बहुतेक मंडळांनी मोठ्या आवाजाचे बेस आणि साऊंड सिस्टिम आणल्या होत्या काही मंडळांनी पारंपारिक वाद्य तसेच इतर ढोल, ताशे, बेंजो यासह इतर वाद्य आणले होते. यादववाडी, छत्रपती शिवाजीनगर, मेन रोड, गाव भाग, माळवाडी, सावंत कॉलनी, शिवसूत्र मंडळ, येथून गाव तलावात विसर्जनासाठी सोय करण्यात आली होती. ग्रामपंचायतीच्या वतीने तराफे तसेच विद्युत झोत याची सोय करण्यात आली होती. तसेच निर्माल्य टाकण्यासाठी ट्रॉल्या लावण्यात आल्या होत्या. काही मंडळांचे साऊंड सिस्टिम आणि विद्युत झोत यासाठी मोठ्या उंचीचे स्ट्रक्चर तयार करण्यात आले होते. हे रस्त्यावरील तारा आणि केबल्स यांना तटत होते. त्यामुळे सुरक्षिततेसाठी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करून मिरवणूक मार्गावरील संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे मिरवणूक मार्गाबरोबरच संपूर्ण गावच अंधारात बुडाले. फक्त मिरवणुकीतील मंडळाबरोबर असलेल्या जनरेटर सेट मुळे गणेश मंडळाच्या मिरवणुकीवर उजेड होता. घराघरात मात्र विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

मिरवणूक सुरू असताना मेन रोडवरील बँक ऑफ इंडिया समोर एका मंडळां ने साऊंड सिस्टिमचा आवाज वाढवला. ध्वनी मर्यादेचे मर्यादेचे उलंघन होत असल्यानेयाबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे साहित्य पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी त्याला आक्षेप घेऊन रोखण्याचा प्रयत्न केला यातून मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात वादावादी झाली काही कार्यकर्त्यांनी थेट कोणी गायकवाड यांच्या अंगावर धावून जाऊन गळपट पकडण्याचा प्रयत्न केला. झालेल्या प्रकाराबद्दल संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्यांवर आणि वादावादी करणाऱ्यांच्या वर गुन्हे दाखल करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

त्यानुसार शिरोली एमआयडीसी पोलीसठाणे हददीत शिरोली पुलाची, यादववाडी येथील गणेशोत्सव मंडळ १] संत रोहिदास तरुण मंडळ, शिरोली पुलाची, २] युवागिरी तालीम मंडळ छसंभाजीराजे चौक शिरोली, ३] शिवशक्ती तरुण मंडळ शिरोली, ४] रणझुंजार तरुण मंडळ, स्थळ मोरेगल्ली शिरोली, ५) जय भवानी तालीम मंडळ शिरोली पुलाची, ६) मरगाई तालीम मंडळ शिरोली, ७] छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळ शिरोली पुलाची, ८] शिवा फौंऊडेशन, ९] त्रिमुर्ती तरुण मंडळ यादववाडी, १०] चेतक क्रिडा मंडळ, शिवाजीनगर शिरोली पुलाची या मंडळाने पोलीसांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून सदर मंडळावर ०५ गुन्हे दाऊल करून सदर मंडळाचे ट्रॅक्टर, ट्रॉली, डॉल्बी सिस्टीम ताब्यात घेऊन पोलीसठाणे आवारात लावण्यात आलेल्या आहेत.

शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे कडील सहा. पोलीस निरीक्षक, सुनिल अर्जुन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अमित पांडे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण, श्रेणी पोसई कोळी, श्रेणी पोसई शेख व पोहेकॉ संकपाळ, पोहेकॉ ९०६ पाटील, सफौ घुगरे, सफौ पाटील, सफौ शेंगाळ यांनी कारवाई केली.

योग्य आवाजातील पारंपारिक वाद्याबरोबरच काही मंडळांच्या हक्कामुळे मोठ्या आवाजाचे साऊंड सिस्टीम मिरवणुकीत लागल्यामुळे या मिरवणुकीला वादाचे गलबोट लागले. याबरोबरच सायंकाळी सात ते मध्यरात्री दीड वाजेपर्यंत तब्बल साडेसहा तास संपूर्ण गावातील विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे नागरिकांचे हाल झाले यातून नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली विद्युत सुरक्षिततेसाठी केलेला हा आघोरी प्रकार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले मध्यरात्री बारा वाजता सर्व मंडळाच्या लाईटचा आणि साऊंड सिस्टिम बंद केल्यानंतर ही तब्बल दीड तासानंतर गावातील विद्युत पुरवठा सुरू केला आणि त्यानंतर पुन्हा पहाटे विद्युत पुरवठा चार तासासाठी बंद केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande