
‘सेवा परमोधर्म’ अभियानासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या विभागांना सूचना
नांदेड, 20 सप्टेंबर (हिं.स.) : जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांचा ‘सेवा परमोधर्म’ अभियानात व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी संबंधित विभागांनी आपल्या कार्यक्षेत्रानुसार विविध उपक्रमांचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या.
प्रत्येक उपक्रमाचा उद्देश, अपेक्षित लाभार्थी, आवश्यक मनुष्यबळ, प्रसिद्धी-प्रसार तसेच अंमलबजावणीचे वेळापत्रक याबाबत योग्य नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा, यासाठी ‘सेवा सेतू’च्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही करण्यावरही त्यांनी भर दिला.
नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘इनोव्हेशन चॅलेंज’ आयोजित करण्यात येणार आहे. तसेच युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. महिला व बालकल्याणाशी संबंधित विविध उपक्रमांच्या माध्यमातूनही जनसहभाग वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
‘जल, जन आणि संकल्प यात्रा’च्या माध्यमातून जलसंवर्धन तसेच लोकसहभागाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. अभियानाच्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांची माहिती नागरिकांना प्रभावीपणे मिळावी, यासाठी संबंधित विभागांनी व्यापक प्रसिद्धी-प्रसाराचे नियोजन करावे, असेही जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले.
शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून देताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर विशेष प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ‘सेवा परमोधर्म’ या संकल्पनेनुसार नागरिकांना अधिक गतिमान, पारदर्शक आणि प्रभावी सेवा देण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी सांगितले.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis