
रत्नागिरी, 20 सप्टेंबर (हिं.स.) । सागरी सीमा मंचाच्या पुढाकाराने विविध संस्था, उद्योग, व्यापारी व नागरिकांच्या सहभागाने आज रत्नागिरीच्या मांडवी समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या अभियानातील टन कचरा संकलित करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिवसानिमित्त दक्षिण रत्नागिरी जिल्हा सागरी सीमा मंचाच्या पुढाकाराने दिनांक 19 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या कालावधीत रत्नागिरी व राजापूर तालुक्यातील 20 समुद्रकिनाऱ्यांवर ‘स्वच्छ सागर अभियान’ आयोजित करण्यात आली आहे. त्याअंतर्गत आज मांडवी समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सकाळी 7.30 वाजता सुरू झालेल्या या अभियानात विविध सामाजिक संस्था, पर्यटन संस्था, उद्योग, व्यापारी संघटना, शासकीय विभाग, स्थानिक नागरिक व स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
गौरी-गणपती विसर्जनानंतर मांडवी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात निर्माल्याच्या प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बाटल्या तसेच इतर कचरा जमा झाला होता. अभियानादरम्यान हा कचरा संकलित करून किनारा स्वच्छ करण्यात आला. सुमारे ३ टन कचरा संकलित करण्यात आला असून दीड ट्रॅक्टर कचऱ्याची वाहतूक करण्यात आली.
स्वच्छता अभियानात रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून अभियान सुरवात करण्यात आली. यावेळी त्यांनी मांडवी किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी नगरपरिषदेचे सहकार्य कायम राहील, असे सांगितले. सागरी सीमा मंचाच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी स्थानिक नगरसेवक बंटी कीर, राजीव किर, पालिका उपमुख्याधिकारी श्री. बेहरे व कर्मचारी उपस्थित होते. अभियानातून संकलित झालेला कचरा पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी वाहनाद्वारे वाहून नेला.
या उपक्रमात महाराष्ट्र सागरी मंडळ बंदर विभाग रत्नागिरी, अल्ट्राटेक सिमेंट कंपनी, मांडवी पर्यटन संस्था, रत्नागिरी पर्यटन संस्था, लघु उद्योग फिश इंडस्ट्रीजचे कर्मचारी, लायन्स क्लब, रत्नागिरी शहर व्यापारी संघ, रत्नागिरी मराठी पत्रकार परिषद – रत्नागिरी जिल्हा, श्री देव भैरी देवस्थान मांडवी, मैत्री ग्रुप–हॉटेल सी फॅन मांडवी, रा. स्व. संघ सेवा विभाग, सागरी सीमा मंच तसेच स्थानिक नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी व स्वयंसेवक सहभागी झाले.
अभियानासाठी अल्ट्राटेक सिमेंट कंपनी व रत्नागिरी शहर व्यापारी संघाने रिफ्रेशमेंटची व्यवस्था, तर लायन्स क्लबने मल्टीयुटिलिटी वेस्ट कलेक्शन बॅग व हँड ग्लोव्हज उपलब्ध करून दिले.
यावेळी उपस्थित संस्था, मंडळांचे पदाधिकारी, स्वयंसेवक व नागरिकांना स्वच्छतेची प्रतिज्ञा सागरी सीमा मंचाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हा संयोजक स्वप्नील सावंत यांनी दिली. मांडवी बीच प्रमुख तथा हॉटेल सी फॅनचे संचालक सुहास ठाकूरदेसाई यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.
उर्वरित समुद्रकिनाऱ्यांवर २६ सप्टेंबर रोजी स्थानिक ग्रामपंचायती, शासनाचे विविध विभाग, सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालये, मंडळे आणि नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सहकार्य मिळणार आहे. समुद्रात कचरा जाण्यापासून रोखणे आणि किनारपट्टी स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये सातत्यपूर्ण जनजागृती निर्माण करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
या अभियानात स्थानिक नागरिक, शासनाचे विविध विभाग, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था व विविध मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सागरी सीमा मंचाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी