
रायगड, 21 सप्टेंबर (हिं.स.)। :
देशभरातील बँक कर्मचारी २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान तीन दिवसांच्या देशव्यापी संपावर जाणार आहेत. 'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स'ने (UFBU) विविध प्रलंबित मागण्यांसाठी या संपाची हाक दिली आहे. विशेष म्हणजे, २६ व २७ सप्टेंबर रोजी शनिवार-रविवारची साप्ताहिक सुट्टी असल्याने बँकांचे शाखा कामकाज सलग पाच दिवस ठप्प राहण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांना महत्त्वाची सूचना जारी करत सतर्क केले आहे.
एसबीआयने ग्राहकांना आवाहन केले आहे की, शाखेत जाऊन करायचे महत्त्वाचे आणि मुदतीचे व्यवहार २८ सप्टेंबरपूर्वीच पूर्ण करावेत. संप काळात शाखांमधील कामकाज विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी एटीएम (ATM), कॅश डिपॉझिट मशिन्स (ADWM), इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, 'योनो' (YONO) ॲप आणि यूपीआय (UPI) यांसारख्या डिजिटल सेवा २४ तास सुरू राहतील, असे बँकेने स्पष्ट केले आहे.
कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या
बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये आठवड्यातून पाच दिवस कामाचे दिवस लागू करणे, पेन्शन नियमांमध्ये सुधारणा, सर्व पेन्शनधारकांना महागाई भत्त्याचे एकसमान सूत्र लागू करणे तसेच एनपीएसऐवजी जुनी पेन्शन योजना स्वीकारण्याचा पर्याय देणे यांचा समावेश आहे. देशातील सुमारे ९० टक्के बँक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या UFBU ने यापूर्वी ११ सप्टेंबरलाही आंदोलन केले होते. दरम्यान, संपामुळे सामान्य नागरिकांना फटका बसू नये यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सार्वजनिक व ग्रामीण बँकांच्या प्रमुखांची उच्चस्तरीय बैठक बोलावली असून पर्यायी व्यवस्था व उपाययोजनांचा आढावा घेतला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)