
बीड, 22 सप्टेंबर, (हिं.स.)। केज, केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या तीर्रट नावाच्या जुगारावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत थार आणि आयफोनसह २४ लाख ६७ हजार रु. चा मुद्देमाल जप्त करून सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले तर एकजण पळून गेला.
युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे यांना एका गुप्त खबऱ्याने माहिती दिली की, ढाकेफळ येथे सुरू असलेल्या बांधकामाच्या शेजारी अवैधरित्या तीर्रट नावाचा जुगार सुरू आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळताच स्वतः सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे आणि पोलिस हेडकॉन्स्टेबल केशव खाडे, पोलिस कॉन्स्टेबल कोकाटे, पठाण, गृहरक्षक दलाचे जवान खरबड, वैरागे, बोराडे, बोरगावकर आणि दोन पंच यांच्या पथकाने छापा मारला. त्यावेळी पोलिसांनी अमोल मनोहर थोरात, सागर गुलाब थोरात, दिनेश राजेभाऊ थोरात, महेश सुभाष थोरात, सुनिल श्रीधर थोरात आणि विष्णु रामकिशन थोरात (सर्व रा. ढाकेफळ ता. केज) यांना ताब्यात घेतले, तर भरत विश्वबर थोरात हा पळून गेला.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या जुगाऱ्याची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्याकडे २१ हजार ५०० रु. रोख, एक आय फोन आणि मोबाईल, एक महिंद्रा थार गाडी यासह जुगाराचे साहित्य असा एकूण २४ लाख ६६ हजार ५०० रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला.
या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सादेक आत्तार यांच्या तक्रारी वरून अमोल मनोहर थोरात, सागर गुलाब थोरात, दिनेश राजेभाऊ थोरात, महेश सुभाष थोरात, सुनिल श्रीधर थोरात, विष्णु रामकिशन थोरात आणि भरत विश्वबर थोरात ( सर्व रा. ढाकेफळ) यांच्या विरुद्ध गु. र. नं. २५८/२०२६ महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हेडकॉन्स्टेबल केशव खाडे हे तपास करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis