अहमदपूरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; ११.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूर, 21 सप्टेंबर (हिं.स.)।अहमदपूर तालुक्यातील थोडगा परिसरात सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर अहमदपूर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धाड टाकून चौघांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, मोबाईल, पत्ते तसेच वाहने असा एकूण ११ लाख
पोलीस कारवाई


लातूर, 21 सप्टेंबर (हिं.स.)।अहमदपूर तालुक्यातील थोडगा परिसरात सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर अहमदपूर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धाड टाकून चौघांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, मोबाईल, पत्ते तसेच वाहने असा एकूण ११ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच तीन जण घटनास्थळावरून फरार झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे १ वाजता थोडगा गावाच्या शिवारातील शंकर मुंडे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली काही जण पैसे लावून तिर्रट जुगार खेळत असल्याची माहिती अहमदपूर पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून कारवाई केली.या कारवाईत शिवराज व्यंकट दहिफळे (४०, रा. कोळवाडी, ता. अहमदपूर, ह.मु. सोनपेठ, जि. परभणी), विनोद परशुराम राठोड (२८, रा. मरशिवणी तांडा, ता. अहमदपूर), राजकुमार अण्णाराव मजगे (६५, रा. वायगाव, ह.मु. अहमदपूर) आणि महेश संजय करले (२८, रा. थोडगा, ता. अहमदपूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.तर अंकुश राठोड, राजू मुंडे आणि अर्जुन गुंडे हे तिघे पोलिसांच्या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून पसार झाले. फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६३०/२०२६, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार विशाल राजेंद्र सारोळे यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस अंमलदार आरदवाड करीत आहेत.

ही कारवाई अहमदपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. मेत्रेवार यांच्या आदेशाने करण्यात आली. जुगाराच्या माध्यमातून सुरू असलेल्या अवैध आर्थिक व्यवहारांविरुद्ध यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande