‘धाकट्या सुनबाई’मधून चिन्मयी मोरेची छोट्या पडद्यावर नवी इनिंग
मुंबई, 23 सप्टेंबर (हिं.स.)। झी मराठीवर लवकरच *‘धाकट्या सुनबाई’* ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नात्यांमधला जिव्हाळा, माणुसकी आणि भावनांची सुंदर गुंफण या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. या मालिकेत *अभिनेत्री चिन्मयी मोरे* ‘ *राधिका’* ची
Chinmayi


मुंबई, 23 सप्टेंबर (हिं.स.)। झी मराठीवर लवकरच *‘धाकट्या सुनबाई’* ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नात्यांमधला जिव्हाळा, माणुसकी आणि भावनांची सुंदर गुंफण या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. या मालिकेत *अभिनेत्री चिन्मयी मोरे* ‘ *राधिका’* ची प्रमुख भूमिका साकारत आहे. सोज्वळ, प्रेमळ आणि आपल्या माणसांच्या सुख-दुःखात खंबीरपणे साथ देणारी राधिका प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण करेल, असा विश्वास चिन्मयी व्यक्त करते. नागपूरची चिन्मयी मोरे लहानपणापासूनच अभिनय क्षेत्राशी जोडलेली आहे. आता ‘धाकट्या सुनबाई’मधून ती पहिल्यांदाच डेली सोपमध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे. या नव्या प्रवासाबद्दल आणि राधिका या व्यक्तिरेखेबद्दल चिन्मयीने मनमोकळ्या गप्पांमध्ये मारल्या.

मी मुळची नागपूरची आहे. माझी आई नाट्य क्षेत्रात असल्यामुळे अगदी लहानपणापासूनच माझा या क्षेत्राशी संबंध आला. मी अवघ्या १० दिवसांची होते, तेव्हा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आले होते. त्यानंतर हळूहळू चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. पुढे व्यावसायिक नाटकं, राज्य नाट्य स्पर्धा, फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स, जाहिराती अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मात्र, डेली सोपचा अनुभव माझ्यासाठी पहिलाच आहे आणि त्यामुळे हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आहे. मला अभिनयाची आवड होती; पण गंमत म्हणजे मला कधीच अभिनेत्री व्हायचं आहे, असं वाटलं नव्हतं. माझं स्वप्न तर पायलट होण्याचं होतं. काही कौटुंबिक कारणांमुळे ते स्वप्न पूर्ण करता आलं नाही. पण म्हणतात ना, आपल्या इच्छेप्रमाणे सगळं घडलं तर छानच असतं; पण आपल्या इच्छेविरुद्ध काही घडलं, तर कदाचित त्यात देवाची इच्छा आणि आपल्यासाठी काहीतरी वेगळं चांगलं दडलेलं असतं. आज मागे वळून पाहताना वाटतं की, कदाचित माझ्यासाठी हाच प्रवास लिहिलेला होता. अभिनयाने मला वेगवेगळ्या माध्यमांतून खूप काही शिकवलं आणि आता राधिकेच्या भूमिकेच्या निमित्ताने हा प्रवास एका नव्या टप्प्यावर आला आहे. त्यामुळे ही संधी मिळाल्याचा मला खूप आनंद आहे.

माझ्या भूमिकेचं नाव राधिका आहे. राधिका अतिशय सोज्वळ, प्रेमळ आणि मनमिळावू मुलगी आहे. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकाची मनापासून काळजी घेणं हा तिच्या स्वभावाचा महत्त्वाचा भाग आहे. आयुष्यात कितीही दुःख किंवा अडचणी आल्या, तरी त्यातही सुख शोधून आनंदी राहण्याचा तिचा प्रयत्न असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, परिस्थिती कितीही कठीण असली तरी राधिका आपल्या माणसांची साथ कधीच सोडत नाही. त्यांच्या प्रत्येक सुख-दुःखात ती खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहते. त्यामुळे राधिकेचा सोज्वळपणा, तिचा प्रेमळ स्वभाव आणि प्रत्येक परिस्थितीकडे सकारात्मकपणे पाहण्याची तिची वृत्ती मला तिच्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट वाटते.

या भूमिकेसाठी माझी निवड ऑडिशनच्या माध्यमातून झाली. खरं सांगायचं तर, माझ्या आयुष्यात असा एक सुंदर वळण येईल आणि ते मला इथपर्यंत घेऊन येईल, याची मलाही कल्पना नव्हती. आपण याआधी ज्यांच्यासोबत काम केलेलं असतं, ते आपलं काम आणि आपल्यातला कलाकार कुठेतरी लक्षात ठेवून असतात. त्यातलेच एक म्हणजे अमित फाटक दादा. त्यांनी याआधी गजानन महाराजांची भूमिका साकारली आहे. आता त्यांच्या माध्यमातून मला राधिकेची भूमिका मिळणं, हा माझ्यासाठी खूप सुंदर योग आहे. त्यांच्या रूपाने मला महाराजांचा प्रसाद मिळाला, अशी माझी भावना आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात एक वेगळा आदर आणि आपुलकी आहे. दादांनीच प्रोडक्शनमध्ये माझं नाव सुचवलं होतं. त्यानंतर माझा फोटो पाहून मला ऑडिशनसाठी कॉल आला. मी ऑडिशन दिलं आणि त्यानंतर माझी या भूमिकेसाठी निवड झाली.

ही भूमिका फक्त पडद्यावर साकारायची नाही, तर राधिका म्हणून ती व्यक्तिरेखा मनापासून जगायची आहे. त्यामुळे प्रत्येक सीनच्या आधी तिच्या जागी स्वतःला ठेवून, त्या क्षणी राधिका काय विचार करेल आणि काय अनुभवेल, हे समजून घेण्याचा माझा प्रयत्न असतो. एखादा प्रसंग करताना राधिका त्या परिस्थितीत असती, तर तिची प्रतिक्रिया काय असती, तिच्या मनात काय सुरू असतं, ती त्या प्रसंगाकडे कशा पद्धतीने पाहते, हे आधी समजून घेण्याचा मी प्रयत्न करते. तिच्या भावना स्वतःला जाणवून घेऊन त्या चेहऱ्यावर, बोलण्यात आणि देहबोलीत आणण्याचा प्रयत्न करतेय.

माझे सगळे सहकलाकार खूपच पाठिंबा देणारे आणि प्रेमळ आहेत. सगळे मला खूप सांभाळून घेतात आणि माझ्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. विशेषतः जेव्हा एखाद्या कलाकाराचा डेली सोपचा हा पहिलाच अनुभव असतो, तेव्हा आजूबाजूची टीम समजून घेणारी आणि साथ देणारी असणं खूप गरजेचं असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, इतकं चांगलं आणि आपल्याला समजून घेणारं दिग्दर्शक आणि टीम मिळणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं. मला खरंच अशी टीम मिळाली आहे, यासाठी मी खूप कृतज्ञ आहे. आमचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे सर मला खूप प्रेमाने सांभाळून घेतात, शिकवतात आणि त्याचबरोबर माझी काळजीही घेतात. त्यामुळे काम शिकताना मला खूप सहज आणि आपलंसं वाटतं. प्रत्येकाकडून काही ना काही शिकायला मिळतंय आणि या सगळ्या कलाकारांसोबत काम करताना माझा स्वतःचा अभिनयाचा प्रवासही अधिक समृद्ध होतोय.

मंदार सोबत ट्युनिंग बद्दल सांगताना चिन्मयी बोलली मंदार आणि मी आता खूप चांगले मित्र होत आहोत आणि हळूहळू आमचे vibes सुद्धा खूप छान जुळत आहेत. तो खरंच खूप छान व्यक्ती आहे आणि त्याच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. को-ॲक्टर म्हणून तो खूप सांभाळून घेतो, आणि सतत पाठिंबा देतो. त्यामुळे त्याच्यासोबत काम करताना मला खूप सहज आणि आपलंसं वाटतं. ऑफस्क्रीनसुद्धा आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र झालो आहोत. एक कलाकार म्हणूनच नाही, तर एक माणूस म्हणूनसुद्धा त्याच्याकडून मला खूप काही शिकायला मिळतं. त्यामुळे आमची छान गट्टी जमली आहे आणि एकमेकांसोबत काम करताना खूप मजा येते. मला वाटतं, ऑनस्क्रीनची केमिस्ट्री चांगली असण्यासाठी ऑफस्क्रीन एकमेकांना समजून घेणं आणि एकमेकांसोबत सहज असणं खूप महत्त्वाचं असतं.

प्रेक्षकांना मी एवढंच म्हणेन की, आजवर तुम्ही झी मराठीच्या मालिकांवर जसं भरभरून प्रेम केलं आहे, तसंच आणि त्याहूनही जास्त प्रेम आमच्या नव्याने येणाऱ्या मालिकेवर करा. ‘धाकट्या सुनबाई’ला आपलंसं करा.

*तेव्हा मालिकेला भरभरून प्रेम द्या आणि बघायला विसरू नका ‘धाकट्या सुनबाई’ २८ सप्टेंबरपासून संध्या ६:३० वा., सदैव तुमच्या झी मराठीवर!*

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande