मुंबईत रंगणार ‘गायन वादन महोत्सव’
मुंबई, 23 सप्टेंबर (हिं.स.)। रसिकांना विविध संगीत प्रकारांचा सुरेल अनुभव देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने ‘गायन वादन महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. सोमवार, २८ सप्टेंबर त
मुंबई


मुंबई, 23 सप्टेंबर (हिं.स.)। रसिकांना विविध संगीत प्रकारांचा सुरेल अनुभव देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने ‘गायन वादन महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. सोमवार, २८ सप्टेंबर ते बुधवार, ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ६ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर, दादर, मुंबई येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, सोमवार, २८ सप्टेंबर रोजी ‘लतानंद’ हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अजरामर गीतांमधील वाद्यसुरांचा प्रवास या कार्यक्रमातून उलगडण्यात येणार असून कमलेश भडकमकर आणि सहकारी हा कार्यक्रम सादर करणार आहेत.

मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी ‘सप्तसूर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुरांच्या विश्वातील एका अजरामर संध्याकाळचा अनुभव देणारा हा कार्यक्रम केदार देशमुख आणि संच सादर करणार आहेत.

बुधवार, ३० सप्टेंबर रोजी ‘भावबंध’ हा संगीत कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. भावगीतांचे रेशीमधागे आणि चित्रपट गीतांची स्पंदने यांचा सुरेल आविष्कार या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवता येणार असून प्राची कोकीळ मराठे व सहकारी हा कार्यक्रम सादर करणार आहेत.

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील संगीतपरंपरेचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासोबतच विविध संगीत प्रकार आणि कलाविष्कार रसिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

‘गायन वादन महोत्सवा’तील सर्व कार्यक्रमांस प्रवेश विनामूल्य असून मुंबईतील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तीन दिवसांच्या या सुरेल संगीत महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande