
नगोया (जपान), २३ सप्टेंबर (हिं.स.) भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत आपली प्रभावी कामगिरी कायम ठेवत, पूल बी च्या सामन्यात थायलंडचा २०-१ ने धुव्वा उडवला. गिफू प्रीफेक्चरल ग्रीन स्टेडियमवर झालेल्या या विजयामुळे भारताने सलग तिसऱ्या सामन्यात दुहेरी अंकी गोल नोंदवले. या विजयामुळे भारत पूल बी च्या गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम आहे. आता भारताचा सामना शुक्रवारी जपानशी होणार आहे.
यापूर्वी भारताने उझबेकिस्तानला १९-० आणि इंडोनेशियाला १७-१ ने पराभूत केले होते. थायलंडविरुद्ध दीपिकाने नऊ गोल केले, तर नवनीत कौरने चार आणि ऋतुजा पिसाळने तीन गोल केले. नेहा, लालरेम्सियामी, साक्षी राणा आणि कर्णधार सलीमा टेटे यांनीही प्रत्येकी एक गोल केला. दीपिकाने तिचे सर्व नऊ गोल पेनल्टी कॉर्नरमधून केले. आशियाई क्रीडा स्पर्धेत एकाच सामन्यात नऊ गोल करणारी ती पहिली भारतीय महिला हॉकीपटू ठरली आहे. दीपिकाने आता तीन सामन्यांमध्ये भारतासाठी २० गोल केले आहेत.
भारताने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व गाजवले आणि थायलंडच्या बचावफळीवर सातत्याने दबाव टाकला. भारतीय खेळाडूंनी पेनल्टी कॉर्नरचाही प्रभावीपणे वापर केला आणि सामन्यावर पूर्ण नियंत्रण ठेवले. थायलंडला अखेर सामन्याच्या चौथ्या क्वार्टरमध्ये गोल करता आला. सुपंसा समन्सोच्या पेनल्टी कॉर्नरवरील ड्रॅग-फ्लिकला किंचित दिशा बदलून चेंडू भारतीय गोलमध्ये गेला.
भारताने हांगझू येथे २०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. भारतीय महिला संघ आता १९८२ नंतर आपले पहिले आशियाई क्रीडा सुवर्णपदक जिंकण्याचे लक्ष्य ठेवत आहे. भारताने १९८२ मध्ये दिल्ली येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन महिला हॉकी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे