एकीकडे अमेरिका-इराणमध्ये पहिली थेट चर्चा, दुसरीकडे केशम बेटाजवळ स्फोटाचा आवाज
तेहरान, 23 सप्टेंबर (हिं.स.)। एकीकडे संयुक्त राष्ट्र महासभेच्या अधिवेशनादरम्यान इराणच्या प्रतिनिधीमंडळाने वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यांशी पहिल्यांदाच थेट चर्चा केली, तर दुसरीकडे इराणी माध्यमांनी होर्मुझ सामुद्रधुनीतील केशम बेटाजवळ स्फोटाचा आवाज ऐकू आल्
एकीकडे अमेरिका-इराणमध्ये शांतता चर्चा, दुसरीकडे केशम बेटाजवळ स्फोटाचा आवाज


तेहरान, 23 सप्टेंबर (हिं.स.)। एकीकडे संयुक्त राष्ट्र महासभेच्या अधिवेशनादरम्यान इराणच्या प्रतिनिधीमंडळाने वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यांशी पहिल्यांदाच थेट चर्चा केली, तर दुसरीकडे इराणी माध्यमांनी होर्मुझ सामुद्रधुनीतील केशम बेटाजवळ स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचा दावा केला.

दीर्घकाळापासून एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या अमेरिका आणि इराणमधील ही अनपेक्षित चर्चा इराणचे प्रतिनिधीमंडळ संयुक्त राष्ट्र महासभेच्या वार्षिक बैठकीसाठी न्यूयॉर्कमध्ये पोहोचले असताना झाली.अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या भाषणानंतर सांगितले की, त्यांचे प्रमुख दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर यांनी जगभरातील नेत्यांच्या या वार्षिक बैठकीदरम्यान इराणी अधिकाऱ्यांशी जवळपास तीन तास चर्चा केली.ट्रम्प म्हणाले की, “ही बैठक खूप चांगली झाली असून लवकरच आणखी चर्चा होणार आहे.” नंतर त्यांनी असेही म्हटले की, इराणचे अधिकारी सर्वोच्च पातळीवरील नव्हते, मात्र “तरीही ही एक सुरुवात आहे.”

दरम्यान, विटकॉफ यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये सांगितले की, ही चर्चा मध्यस्थांच्या माध्यमातून झाली. हे मध्यस्थ अमेरिकी आणि इराणी पथकांमध्ये ये-जा करत होते. ही प्रक्रिया रचनात्मक आणि आशादायी ठरेल, अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी म्हटले. इराणचे प्रतिनिधीमंडळ अमेरिकेसोबत शांतता चर्चा करत असतानाच इराणी माध्यमांनी होर्मुझ सामुद्रधुनीतील केशम बेटाजवळ स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचे वृत्त दिले.

सरकारी वृत्तसंस्थाने दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटामागचे कारण आणि त्याचा परिणाम याबाबत तत्काळ कोणतीही माहिती मिळू शकली नाही. फेब्रुवारीमध्ये इराणविरोधात अमेरिका-इस्रायल युद्ध सुरू झाल्यापासून केशम बेटावर अनेक स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिली होती की, जवळपास सात महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी लवकरच कोणताही करार झाला नाही, तर ते या इस्लामिक देशाला पूर्णपणे उद्ध्वस्त करतील. जवळपास सात महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धाचा परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावर झाला असून, इराणच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या इस्लामिक देशात चलनाचे संकट निर्माण झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande