
वॉशिंग्टन, 23 सप्टेंबर (हिं.स.)।चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग अमेरिका दौऱ्यावर जाणार असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतः त्यांचे स्वागत करणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ट्रम्प अमेरिकन नागरिकांना चीन अमेरिकेचा आर्थिक फायदा घेत असल्याचे सांगत आले आहेत. मात्र, आता ते अशा ठिकाणी जाणार आहेत, जिथे यापूर्वी कोणताही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष गेलेला नाही.
ट्रम्प वॉशिंग्टन डीसीबाहेरील अँड्र्यूज एअर फोर्स बेसवर जाऊन तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर येणाऱ्या शी जिनपिंग यांचे वैयक्तिकरित्या स्वागत करणार आहेत. या वेळी टॅरिफ लावणारे कठोर नेते अशी प्रतिमा बाजूला ठेवून ट्रम्प सौजन्यशील यजमानाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या स्वागताकडे संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे.
एअरबेसवर शी जिनपिंग यांच्या स्वागतानंतर दुसऱ्या दिवशी व्हाइट हाऊसमध्ये भव्य औपचारिक स्वागत समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये ४७९ सदस्यांचा मिलिटरी ऑनर गार्ड, राष्ट्राध्यक्षांना दिली जाणारी तोफांची सलामी, रोज गार्डनमध्ये लष्करी संचलन तसेच चार एफ-२२ रॅप्टर लढाऊ विमानांसोबत बी-२ स्पिरिट बॉम्बरचा हवाई संचलनाचा समावेश असेल. चीनला प्रभावित करण्यासाठी हा सर्व भव्य सोहळा आयोजित केला जात असल्याचे चित्र आहे; मात्र चीन कदाचित अशा प्रभावाच्या पलीकडे गेला असल्याचे काही निरीक्षकांचे मत आहे.
परदेशी पाहुण्याचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर स्वतः जाणारे शेवटचे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि जॉर्ज डब्ल्यू. बुश होते. त्यांनी अनुक्रमे पोप फ्रान्सिस आणि पोप बेनेडिक्ट यांच्या स्वागतासाठी अँड्र्यूज एअर फोर्स बेसला भेट दिली होती.मे महिन्यात ट्रम्प चीनच्या राजकीय दौऱ्यावर गेले होते, तेव्हा शी जिनपिंग स्वतः अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या स्वागतासाठी विमानतळावर गेले नव्हते. त्यांनी त्यांचे उपराष्ट्राध्यक्ष हान झेंग आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्वागतासाठी पाठवले होते.
जेफ बेझोस, एलन मस्क, जेन्सेन हुआंग, सॅम ऑल्टमन, टिम कुक, जेन फ्रेझर आणि मायकेल डेल यांच्यासह अनेक प्रमुख उद्योगपती ट्रम्प-शी जिनपिंग यांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. या प्रभावशाली यादीत भारतीय वंशाचे गुगलचे सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे सत्य नडेला यांचाही समावेश आहे.विशेष बाब म्हणजे शी जिनपिंग यांच्यासोबत चीनमधील कोणत्याही मोठ्या उद्योगसमूहाचे वरिष्ठ अधिकारी येत नसल्याचे सांगितले जात आहे.
या बैठकीत व्यापार आणि टॅरिफचा मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. नाजूक व्यापार करार पुढे नेणे, दोन्ही देशांकडून टॅरिफमध्ये संभाव्य कपात, कृषी उत्पादनांची खरेदी आणि द्विपक्षीय व्यापार व्यवस्थापित करण्याच्या पद्धतींवर चर्चा होऊ शकते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode