
परभणी, 24 सप्टेंबर (हिं.स.)।
किसान सभा, लाल बावटा व माकपच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सेलू तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
गेल्या दोन महिन्यांपासून सेलू तालूक्यासह परभणी जिल्ह्यात पाऊस झाला नाही. खरीपातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी सर्वच पिके वाळून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी कष्टकरी वर्ग हादरुन गेला. किसान सभेच्या वतीने राज्य सरकारचा धिक्कार करण्यात आला. यावेळी आंदोलकांच्या घोषणाबाजीने परीसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी, कोरडा दुष्काळ जाहीर करावा, हेक्टरी १ लाख रुपये पिक नुकसान भरपाई द्यावी, शेतमजूरांना बुडीत कामाची प्रती कुटूंब ५० हजार रुपये भरपाई द्यावी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख रुपये प्रोत्साहन अनुदान द्यावे, नदीजोड प्रकल्प प्राधान्याने अंमलात आणावा, जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून एक्स्प्रेस कॅनॉल बांधून लोअर दुधना प्रकल्पात पाणी आणून पिण्याला व शेतीला पाणी पुरवठा करावा, लाडक्या बहिणींचे बंद केलेले अनुदान पुर्ववत चालू करावे आदी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार विजय मोरे यांना दिले. तसेच तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
या आंदोलनात कॉम्रेड रामेश्वर पौळ, रामकृष्ण शेरे पाटील, दत्तु सिंग ठाकुर, उद्धव पौळ, आकाश खनपटे, सुभाष शहाणे, रोहीदास हातकडके, कल्पना शिंदे, सोनाबाई काळे, गणपत गोंडगे, सुखानंद कटारे, द्वारकाबाई हिंगे, रंगनाथ ताठे, शांतीराम पौळ, खंडू पडूळे, श्याम शेरे, आशामती लव्हाळे, मालती काकडे, बंडू हिंगे, संतोष पौळ, किशन पौळ, ज्ञानेश्वर गयबु, रत्नेश्वर पौळसह अनेक शेतकरी व महिला सहभागी झाल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis