दुष्काळी मदतीसाठी संजय जाधव यांची मंत्रालयात धाव; उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्र्यांची घेतली भेट
परभणी, 24 सप्टेंबर (हिं.स.)। परभणी लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रश्न तसेच नागरिकांच्या मागण्यांसंदर्भात खासदार संजय जाधव यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मंत्री मकरंद पाटील, भारत गोगावले आणि संजय राठोड य
दुष्काळी मदतीसाठी संजय जाधव यांची मंत्रालयात धाव; उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्र्यांची घेतली भेट


परभणी, 24 सप्टेंबर (हिं.स.)।

परभणी लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रश्न तसेच नागरिकांच्या मागण्यांसंदर्भात खासदार संजय जाधव यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मंत्री मकरंद पाटील, भारत गोगावले आणि संजय राठोड यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांबाबत मंत्र्यांना निवेदन देत शासनस्तरावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान परभणीसह मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीकडे पुन्हा लक्ष वेधत शेतकर्यांना तातडीने मदत देण्याची मागणी जाधव यांनी केली. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगत परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकर्यांना तातडीची आर्थिक मदत, कर्जमाफी, पीक विम्याचा लाभ, रोजगार हमीची कामे सुरू करणे, मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे हाती घेणे, जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करणे तसेच गावागावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.

यासोबतच परभणी लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामांना गती देणे, प्रलंबित कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणे आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे शासनस्तरावर तातडीने लक्ष देण्याबाबतही संबंधित मंत्र्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन मंत्र्यांकडे सादर करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande