
परभणी, 24 सप्टेंबर (हिं.स.)।
परभणी तालुक्यातील शेतकर्यांच्या वीज समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पोखर्णी नृसिंह (शिवारा) येथे नवीन 132 केव्ही ईएचव्ही विद्युत उपकेंद्र मंजूर करून उभारण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती ऐश्वर्या अजय चव्हाण यांनी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, परभणी तालुक्यातील शेतकर्यांना पाणीटंचाईसोबतच वीज समस्येलाही सामोरे जावे लागत आहे. पोखर्णी येथील 33 केव्ही वाहिनीवर अनेक उपकेंद्रे जोडलेली असल्याने या वाहिनीवर मोठ्या प्रमाणात विद्युत भार येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकर्यांना अपेक्षित वीजदाब मिळत नसल्याने कृषी पंप सुरळीतपणे चालत नाहीत. परिणामी पिकांना आवश्यक पाणी देताना शेतकर्यांच्या अडचणी वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पोखर्णी नृसिंह (शिवारा) येथे 132 केव्ही ईएचव्ही विद्युत उपकेंद्र तातडीने मंजूर करून उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या उपकेंद्रामुळे परिसरातील शेतकर्यांना स्थिर वीजदाब मिळण्यास तसेच कृषी पंपांचा वीजपुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होईल, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
यापूर्वी पोखर्णी परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याची मागणीही करण्यात आली होती. त्या मागणीचा सकारात्मक विचार करून प्राथमिक आरोग्य केंद्राला लवकरात लवकर मान्यता देण्याची विनंतीही यावेळी करण्यात आली. शेतकर्यांच्या वीज समस्येची दखल घेऊन 132 केव्ही उपकेंद्राच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis