रत्नागिरी जिल्ह्यात २८५ सार्वजनिक तर २,२९३ खासगी दहीहंड्या
रत्नागिरी, 3 सप्टेंबर (हिं.स.) । रत्नागिरी जिल्ह्यात शनिवार, ५ सप्टेंबर रोजी २८५ सार्वजनिक तर २,२९३ खासगी दहीहंड्या उभारल्या जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सार्वजनिक दहीहंड्यांच्या स
रत्नागिरी जिल्ह्यात २८५ सार्वजनिक तर २,२९३ खासगी दहीहंड्या


रत्नागिरी, 3 सप्टेंबर (हिं.स.) । रत्नागिरी जिल्ह्यात शनिवार, ५ सप्टेंबर रोजी २८५ सार्वजनिक तर २,२९३ खासगी दहीहंड्या उभारल्या जाणार आहेत.

जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सार्वजनिक दहीहंड्यांच्या संख्येत १८७ ने घट नोंदवली गेली असली, तरी घरगुती व गल्लीबोळांतील खासगी हंड्यांमध्ये १५ ने वाढ झाली आहे. सार्वजनिक हंड्यांची संख्या घटली असली, तरीही स्थानिक तरुणाई आणि गोविंदा पथकांमधील जल्लोष सुरू आहे.

विविध राजकीय पक्ष आणि नामांकित सामाजिक संस्थांनी दहीहंडीसाठी लाखो रुपयांची रोख बक्षिसे जाहीर केली आहेत. सलामी देणाऱ्या आणि सहा ते सात थरांचे उंच मनोरे रचून अचूक हंडी फोडणाऱ्या धाडसी पथकांसाठी भरघोस पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. यामुळे मानाच्या आणि मोठ्या हंड्यांवर जिल्ह्यातील मातब्बर पथकांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

उत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने रत्नागिरी शहर, चिपळूण, खेड, राजापूरसह ग्रामीण भागातील गोविंदा पथकांचा सराव आता अंतिम टप्प्यात आला आहे. रात्रीच्या शांततेत चौकाचौकांतून येणारा शिट्ट्यांचा आवाज आणि थरांची तालीम उत्सवाची उत्सुकता वाढवत आहे. दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा पोलीस प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. उंच मनोरे रचताना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट आणि गाद्या यांसारखी सुरक्षा साधने वापरण्याचे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून सण शिस्तीत व शांततेत साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी सर्व आयोजक आणि मंडळांना केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande