छ. संभाजीनगर : सरकारी कार्यालयांत दर शुक्रवारी ‘कोरडा दिवस’ पाळण्यात येणार
छत्रपती संभाजीनगर, 03 सप्टेंबर (हिं.स.)। सरकारी कार्यालयांत दर शुक्रवारी ‘कोरडा दिवस’ पाळण्यात येणार आहे त्या संदर्भात सूचना जारी करण्यात आले आहेत. शासकीय कार्यालयांसाठीही स्वतंत्र सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक सरकारी कार्यालयात दर शुक्रवारी ‘
छ. संभाजीनगर : सरकारी कार्यालयांत दर शुक्रवारी ‘कोरडा दिवस’ पाळण्यात येणार


छत्रपती संभाजीनगर, 03 सप्टेंबर (हिं.स.)। सरकारी कार्यालयांत दर शुक्रवारी ‘कोरडा दिवस’ पाळण्यात येणार आहे त्या संदर्भात सूचना जारी करण्यात आले आहेत. शासकीय कार्यालयांसाठीही स्वतंत्र सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक सरकारी कार्यालयात दर शुक्रवारी ‘कोरडा दिवस’ पाळावा. कार्यालयाच्या छतावर,गॅलरीत किंवा आवारात पडलेले जुने टायर, फुटके प्लास्टिक,कुंड्यांचे ट्रे आणि अन्य टाकाऊ वस्तूंची तात्काळ विल्हेवाट लावावी.पिण्याच्या पाण्याच्या टाक्या,कुलर आणि सिमेंटच्या टाक्या आठवड्यातून एकदा पूर्ण रिकाम्या करून वाळवाव्यात.कार्यालय परिसरातील सांडपाण्याच्या गटारी तसेच साचलेल्या पाण्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत म्हणजे नगरपालिका अथवा ग्रामपंचायतीमार्फत अळीनाशक औषधाची किंवा आवश्यकतेनुसार जळलेल्या ऑइलची फवारणी करावी.डासांचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या ठिकाणी सायंकाळच्या वेळी धुरीकरण (फॉगिंग) करून घ्यावे.

कर्मचारी-अभ्यागतांना शुद्ध पाणी द्या

कार्यालयातील कर्मचारी आणि अभ्यागतांसाठी स्वच्छ,उकळलेले किंवा शुद्ध आरओ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. स्वच्छतागृहांमध्ये दररोज फिनाईल किंवा ब्लिचिंगसारख्या जंतुनाशक द्रव्यांचा वापर करून स्वच्छता राखावी.हात धुण्यासाठी साबण किंवा हँडवॉश उपलब्ध करून द्यावा.शासकीय कार्यालयाच्या आवारातील उपहारगृहांमध्ये अन्नपदार्थ योग्यप्रकारे झाकून ठेवले आहेत की नाही,याची संबंधित कार्यालयप्रमुखांनी तपासणी करावी.

कार्यालयांमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश अथवा कृत्रिम प्रकाश राहील आणि हवा खेळती राहील अशी व्यवस्था करावी.एखाद्या कर्मचाऱ्याच्या घरी क्षयरोगासारख्या संसर्गजन्य आजाराने ग्रस्त व्यक्ती असल्यास संबंधित कर्मचाऱ्यानेही आवश्यक वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.कार्यालयामध्ये शक्यतो कुलर अथवा एसीचा वापर टाळावा. वापरात असलेल्या कुलरमधील पाणी नियमितपणे बदलावे.जुने व वापरण्यायोग्य नसलेले कुलर असल्यास त्यांचे नियमानुसार निर्लेखन करावे.

ताप असलेल्या कर्मचाऱ्यांना विश्रांती द्या

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात असताना शक्यतो पूर्ण बाह्यांचे कपडे वापरावेत आणि डास प्रतिबंधक मलम किंवा क्रीमचा वापर करावा.पिण्यासाठी शक्यतो स्वतःची पाण्याची बाटली घरून आणावी.कार्यालयातील कोणत्याही कर्मचाऱ्याला ताप, सर्दी,खोकला किंवा अंगावर पुरळ येण्यासारखी लक्षणे दिसल्यास त्याला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी पाठवावे.ताप असलेल्या कर्मचाऱ्यांमुळे संभाव्य संसर्गाचा प्रसार होऊ नये आणि संबंधित कर्मचाऱ्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी वेळ मिळावा,यासाठी त्याला आवश्यक विश्रांती घेण्याची परवानगी द्यावी.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande