छ. संभाजीनगरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनपाची विशेष आढावा बैठक
छत्रपती संभाजीनगर, ३ सप्टेंबर (हिं.स.) : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची विशेष आढावा बैठक महापौर समीर राजूरकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. गणेशोत्सव काळात गणेश मंडळे आणि भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी
अ


छत्रपती संभाजीनगर, ३ सप्टेंबर (हिं.स.) : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची विशेष आढावा बैठक महापौर समीर राजूरकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. गणेशोत्सव काळात गणेश मंडळे आणि भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला.

विसर्जन व मिरवणूक मार्गांवरील खड्डे बुजविणे, रस्त्यांचे पॅचवर्क, गणेश मंडळांसाठी एक खिडकी योजना, विसर्जन विहिरी व कृत्रिम तलावांची तयारी, तसेच विसर्जन स्थळांवरील प्रकाशयोजना आणि जनरेटर व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.

गणेशोत्सव हा आनंद, भक्ती आणि उत्साहाचा सण असल्याने गणेश मंडळे तसेच भाविकांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या सूचना महापौर समीर राजूरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. सर्व आवश्यक कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवाच्या काळात शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने महापालिकेच्या सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे. उत्सव सुरक्षित, सुकर आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनाने पूर्णपणे सज्ज राहावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande