
रत्नागिरी, 3 सप्टेंबर (हिं.स.) । वाशिष्ठी नदीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या आईवर मगरीने हल्ला केल्यानंतर प्रसंगावधान राखत आईला मगरीच्या तावडीतून सोडविण्यासाठी धाडस दाखविणाऱ्या दहा वर्षीय कु. स्वर्णी भूपेंद्र पवार हिचा चिपळूण जिजाऊ ब्रिगेडतर्फे गौरव करण्यात आला.
गणेशवाडी (वालोपे) येथील तिच्या राहत्या घरी जाऊन जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वर्णीच्या धाडसाचे कौतुक केले. यावेळी स्वर्णीला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच तिच्या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी स्वर्णी आणि तिच्या आईने त्या दिवशी वाशिष्ठी नदीत घडलेला प्रसंग तसेच स्वर्णीने दाखविलेल्या धाडसाची माहिती जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना दिली. नशिबाने साथ दिल्याने आईचा जीव वाचला असून, पाचवीत शिकणाऱ्या स्वर्णीने आईसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दाखविलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे.
स्वर्णीच्या गौरवप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष स्नेहल चव्हाण, जिल्हा सचिव पूर्वा तांदळे, तालुका संघटक सुकन्या चव्हाण, खेड तालुका अध्यक्षा रोहिणी मोरे, शहर अध्यक्षा वर्षा खटके-पाटील, शहर उपाध्यक्षा अपूर्वा गायकवाड, शहर कार्याध्यक्षा प्रीती साळवी, शहर सचिव माया जाधव, शहर संघटक दिलबर खान, वरिष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सीमा चाळके तसेच सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती कदम उपस्थित होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी