हल्द्वानीतील ‘शुद्धीकरण’ वादावर खरगेंचे जे.पी. नड्डांना पत्र
अजूनपर्यंत एफआयआर न नोंदवल्याबद्दल व्यक्त केली नाराजी नवी दिल्ली, 03 सप्टेंबर (हिं.स.) : काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेतील सभागृह नेते जे. पी. नड्डा यांना पत्र लिहून हल्द्वानी येथे झालेल्या कथित ‘
कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (फाइल फोटो)।


अजूनपर्यंत एफआयआर न नोंदवल्याबद्दल व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली, 03 सप्टेंबर (हिं.स.) : काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेतील सभागृह नेते जे. पी. नड्डा यांना पत्र लिहून हल्द्वानी येथे झालेल्या कथित ‘शुद्धीकरण’ प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेला 24 दिवस उलटूनही अद्याप एफआयआर दाखल करण्यात आल्याद्दल खरगे यांनी आश्चर्य व्यक्त केले.

आपल्या पत्रात खरगे म्हणाले की, शुद्धीकरणाचा मुद्दा माझ्यापुरता किंवा काँग्रेस अध्यक्षपदापुरता मर्यादित नाही. हा कोट्यवधी लोकांच्या भावनांशी अत्यंत जवळून जोडलेला विषय आहे. हल्द्वानीतील या घटनेत सहभागी असलेल्या व्यक्ती आणि संघटनांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना द्यावेत, अशी मागणीही त्यांनी नड्डा यांच्याकडे केली.खरगे यांनी पत्रात नमूद केले की, 13 ऑगस्ट 2026 रोजी राज्यसभेत त्यांनी अत्यंत दुःख आणि वेदनेने हल्द्वानीतील 8 ऑगस्ट रोजी झालेल्या त्यांच्या जाहीर सभेनंतर कथितरित्या करण्यात आलेल्या ‘शुद्धीकरणा’चा मुद्दा उपस्थित केला होता.

या मुद्द्यावर राज्यसभेत उत्तर देताना जे. पी. नड्डा यांनी ही घटना अत्यंत दुःखद असल्याचे म्हटले होते. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते, असा उल्लेख खरगे यांनी पत्रात केला आहे.

मात्र, घटनेला 24 दिवस उलटूनही हल्द्वानीमध्ये या कथित घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित संघटना आणि व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल न झाल्याबद्दल खरगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे 8 ऑगस्ट 2026 रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची जाहीर सभा झाली होती. त्यानंतर दोन दिवसांनी, म्हणजेच 10 ऑगस्ट रोजी त्यांच्या सभेसाठी उभारण्यात आलेल्या मंचाचे कथित ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला.काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत या घटनेचा उल्लेख करत, 8 ऑगस्टला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची हल्द्वानीमध्ये सभा होते आणि 10 ऑगस्टला भाजप-आरएसएसचे लोक त्यांच्या मंचाचे शुद्धीकरण करतात, असा आरोप केला होता.

काँग्रेस नेत्यांनी या घटनेला दलित समाजाचा अपमान तसेच अस्पृश्यतेशी संबंधित कृत्य असल्याचे म्हटले. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करून एफआयआर दाखल करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली.दरम्यान, कथित ‘शुद्धीकरण’ करणाऱ्या संघटना आणि स्थानिक नागरिकांनी या घटनेमागे जातीय भेदभाव असल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande