
मुंबई, 3 सप्टेंबर (हिं.स.) । कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोड या मार्गावर कोकण रेल्वेने नवी एक्स्प्रेस गाडी केली आहे. उद्घाटनाच्या गाडीला आज (दि. ३ सप्टेंबर) दुपारी एक वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी हिरवा झेंडा दाखवला.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाला उपस्थित होते. या गाडीच्या दोन्हीकडून सुटण्याच्या आणि पोहोचण्याच्या वेळा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.
ही गाडी सुरू झाल्यामुळे कोकणवासीयांची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित करण्यात आलेल्या शानदार सोहळ्यात गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नीतेश राणे यांनी या गाडीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले असून, कोकणवासीयांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. दररोज धावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड एक्स्प्रेसचा क्रमांक १५०८७, तर सावंतवाडी रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस परतीच्या गाडीचा क्रमांक १५०८८ असा आहे. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबणार असून, यामुळे मुंबई आणि संपूर्ण कोकणातील प्रवाशांना आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी