
छत्रपती संभाजीनगर, 03 सप्टेंबर (हिं.स.)। टपाल सेवा घेताना येणाऱ्या अडचणी,प्रलंबित तक्रारी आणि ग्राहकांच्या गाऱ्हाण्यांची अधिक प्रभावी व वेळेत सोडवणूक व्हावी, यासाठी भारतीय डाक विभागाने सप्टेंबर २०२६ पासून दरमहा ‘डाक अदालत’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याबरोबरच आवश्यकतेनुसार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (VC) या अदालतीत सहभागी होता येणार आहे. विशेष म्हणजे,डाक अदालतीत प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारींचे १४ दिवसांच्या आत निराकरण करण्यात येणार आहे.
ग्राहकांचा अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी डाक अदालत विभागीय, प्रादेशिक आणि मंडळ (सर्कल) स्तरावर अनुक्रमे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात आयोजित केली जाणार आहे.त्यामुळे टपाल विभागाशी संबंधित तक्रारी आणि समस्या मांडण्यासाठी ग्राहकांना आता दरमहा स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.टपाल,प्रत्यक्ष किंवा ई-मेलद्वारे तक्रार
ग्राहकांना आपली तक्रार अथवा गाऱ्हाणी टपालाद्वारे,प्रत्यक्ष किंवा sposmd.mah@gmail.com या ई-मेल पत्त्यावर सादर करता येतील.प्राप्त झालेल्या तक्रारींची संबंधित कार्यालयाकडून सविस्तर तपासणी करण्यात येईल.शक्य असल्यास डाक अदालतीच्या वेळीच तक्रारीचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तथापि,डाक अदालतीत प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचे १४ दिवसांच्या आत निराकरण करण्यात येईल.
धाराशिव विभागातील विभागीय स्तरावरील डाक अदालत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.पहिल्या सोमवारी शासकीय सुट्टी असल्यास त्यानंतरच्या पुढील कामकाजाच्या दिवशी डाक अदालत होईल.ही अदालत डाकघर अधीक्षक कार्यालय,धाराशिव विभाग,लेन्सकार्ट दुकानाच्या वर,भानूनगर,धाराशिव येथे आयोजित करण्यात येणार आहे.
डाक अदालतीच्या दिवशी ग्राहकांना आवश्यक सहकार्य मिळावे तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या कार्यवाहीचा समन्वय साधता यावा, यासाठी धाराशिव मुख्य डाकघरात जनसंपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यामुळे प्रत्यक्ष डाक अदालतीच्या ठिकाणी पोहोचणे शक्य नसलेल्या ग्राहकांनाही आवश्यकतेनुसार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपली समस्या मांडण्याची सुविधा मिळणार आहे.
टपाल सेवा ही नागरिकांच्या दैनंदिन व्यवहाराशी जोडलेली असल्याने त्यासंबंधीच्या तक्रारींचे वेळेत निराकरण होणे महत्त्वाचे आहे.दरमहा होणाऱ्या डाक अदालतीच्या माध्यमातून ग्राहकांना आपले म्हणणे थेट विभागासमोर मांडण्याची संधी मिळणार आहे. ग्राहकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपल्या तक्रारी व गाऱ्हाणी डाक अदालतीमार्फत मांडावीत,असे आवाहन धाराशिव विभागाचे डाक अधीक्षक आर. एस.बोटलावार यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis