
नाशिक, 03 सप्टेंबर, (हिं.स.)। शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन २०२६ च्या गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधून प्राप्त झालेल्या प्रस्तावांमधून एकूण १५ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
सन २०२६ च्या गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधून एकूण ४३ प्रस्ताव प्राप्त झाले होते. प्राप्त प्रस्तावांमध्ये नमूद केलेल्या गुणवत्ता विषयक कामकाजाची तसेच शिक्षकांनी राबविलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची शाळा व वर्गस्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणीची पडताळणी करण्यात आली. त्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांचे गट बदल करून प्रत्यक्ष मूल्यांकनाची कार्यवाही करण्यात आली.
गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेले गुणांकन, शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, कामकाजातील नाविन्यता, राबविण्यात आलेले शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी केलेले योगदान तसेच इतर निर्धारित निकषांचा विचार करून जिल्हास्तरीय निवड समितीने एकूण १५ शिक्षकांची सर्वानुमते गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे. सदर निवडीस मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांनी मान्यता दिली आहे.
सन २०२६ गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेले शिक्षक
| अ.क्र. | तालुका | शिक्षकाचे नाव व शाळा |
| ------ | ------------- | ------------------------------------------------------------------------- |
| १ | बागलाण | श्रीमती माधुरी सुभाष पवार, प्राथमिक शिक्षिका, जि.प. शाळा अजमीर सौंदाणे |
| २ | चांदवड | श्री. सतीश भाऊसाहेब अहिरे, प्राथमिक शिक्षक, जि.प. शाळा काजीसांगवी |
| ३ | देवळा | श्री. सतीश गोविंदराव आहेर, प्राथमिक शिक्षक, जि.प. शाळा आहेरवस्ती |
| ४ | दिंडोरी | श्री. भिलाजी माधवराव पाटील, प्राथमिक शिक्षक, जि.प. शाळा उमराळे खुर्द |
| ५ | इगतपुरी | श्री. अवधुत रामदास खाडगीर, पदवीधर शिक्षक, जि.प. शाळा भरविर खुर्द |
| ६ | कळवण | श्रीमती सविता तानाजी भामरे, प्राथमिक शिक्षिका, जि.प. शाळा कळवण मुली नं. १ |
| ७ | मालेगाव | श्रीमती मीना निषा देवरे, प्राथमिक शिक्षिका, जि.प. शाळा सौंदाणे नं. १ |
| ८ | नांदगाव | श्री. गणेश पुंडलिक साळी, प्राथमिक शिक्षक, जि.प. शाळा गंगाधरी मोठी |
| ९ | नाशिक | श्री. विवेक पुंडलिक खैरनार, पदवीधर शिक्षक, जि.प. शाळा महादेवपूर |
| १० | निफाड | श्रीमती गौरी राजेंद्र गायवन, प्राथमिक शिक्षिका, जि.प. शाळा तळेगाव वाट |
| ११ | पेठ | श्री. योगेंद्र गणपत बोरसे, प्राथमिक शिक्षक, जि.प. शाळा दोनवाडे |
| १२ | सिन्नर | श्री. प्रकाश दत्तु जगताप, मुख्याध्यापक, जि.प. शाळा धोंडबार |
| १३ | सुरगाणा | श्री. सुधाकर कृष्णा भोये, प्राथमिक शिक्षक, जि.प. शाळा सुरगाणा नं. १ |
| १४ | त्र्यंबकेश्वर | श्री. संदीप दत्तात्रय गुंजाळ, प्राथमिक शिक्षक, जि.प. शाळा वाघेरा |
| १५ | येवला | श्री. योगेश बाळासाहेब माकोणे, प्राथमिक शिक्षक, जि.प. शाळा दुगलगाव |
गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या सर्व १५ शिक्षकांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी तसेच विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षकांनी केलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI