
छत्रपती संभाजीनगर, ३ सप्टेंबर (हिं.स.) : वर्षानुवर्षे सुरू असलेला न्यायालयीन वाद म्हणजे वेळ, पैसा आणि मानसिक तणाव. अशा प्रलंबित वादांना सामोपचाराने पूर्णविराम देण्याची संधी नागरिकांना राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून मिळणार आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार वाहन अपघात प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, वीज वितरण कंपनीशी संबंधित प्रकरणे, दिवाणी तसेच तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय बँका आणि वीज वितरण कंपन्यांशी संबंधित दाखलपूर्व प्रकरणांचाही लोकअदालतीमध्ये विचार केला जाणार आहे.कौटुंबिक न्यायालय तसेच ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रकरणेदेखील या राष्ट्रीय लोकअदालतीत तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे विविध स्वरूपाच्या न्यायालयीन तसेच दाखलपूर्व वादांमध्ये परस्पर सहमतीने तोडगा काढण्यासाठी पक्षकारांना एकाच दिवशी महत्त्वाची संधी उपलब्ध होणार आहे.लोकअदालतीमध्ये एखादे प्रकरण तडजोडीने निकाली निघाल्यास संबंधित पक्षकाराने भरलेली न्यायालयीन फी परत मिळते. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत खर्च होणारा वेळ आणि पैसा वाचण्यासोबतच दीर्घकाळ चालणाऱ्या वादामुळे निर्माण होणारा मानसिक ताणही कमी होण्यास मदत होते.
नागरिकांना सहभागाचे आवाहन
नागरिकांनी आपापसांतील वाद सामोपचाराने मिटवून वेळ, पैसा आणि मानसिक ताण-तणाव वाचवावा तसेच राष्ट्रीय लोकअदालतीचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा अभिश्री देव आणि सचिव भाग्यश्री पाटील यांनी केले आहे.आपली प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांनी जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद किंवा संबंधित तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा. तसेच प्रकरण लोकअदालतीमध्ये ठेवण्यासाठी पक्षकारांनी आपल्या वकिलांशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.राष्ट्रीय लोकअदालतीबाबत अधिक माहितीसाठी ८५९१९०३६२५ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा dlsaosd25@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधता येईल.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis