
बीड, 03 सप्टेंबर, (हिं.स.)। माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या उपस्थितीत शाश्वत सिंचन व्यवस्थेसाठी आढावा बैठक संपन्न झाली. माजलगाव मतदारसंघातील सिंचन व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध सिंचन प्रकल्प, जलस्रोतांचा कार्यक्षम वापर आणि प्रलंबित कामांचा सातत्याने आढावा घेण्यात येत आहे.
याच अनुषंगाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयात आ. प्रकाश दादा सोळंके यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस दादांसमवेत उपस्थित राहून विविध विषयांवरील चर्चेत सहभाग घेतला.
बैठकीत माजलगाव जलाशयासाठी मंजूर पाणी उपलब्धता, पश्चिमवाहिनी नदीखोऱ्यातून अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळविण्याची योजना, अपूर्ण व अकार्यक्षम सिंचन व्यवस्था, तसेच सिंचन प्रकल्पांचे व्यवस्थापन हस्तांतरण याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मंजूर पाण्याच्या प्रमाणानुसार माजलगाव जलाशयात पाणी उपलब्ध होण्यासाठी आवश्यक तांत्रिक नियोजन, अतिरिक्त जलस्रोतांचा सिंचनासाठी प्रभावी वापर, प्रलंबित प्रकल्पांची पूर्तता आणि आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय कार्यवाही कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
शेतकऱ्यांसाठी शाश्वत सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी समन्वयाने कार्यवाही आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis