छ. संभाजीनगर - तापाचा वाढता धोका; जिल्ह्यात ‘आरोग्य अलर्ट’
छत्रपती संभाजीनगर, 03 सप्टेंबर (हिं.स.) धाराशिव जिल्ह्यात सध्या तापाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.वाढत्या तापाच्या रुग्णांमध्ये डेंग्यू, मलेरियासह अन्य कीटकजन्य आजार उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिक,शाळा- मह
छ. संभाजीनगर - तापाचा वाढता धोका; जिल्ह्यात ‘आरोग्य अलर्ट’


छत्रपती संभाजीनगर, 03 सप्टेंबर (हिं.स.) धाराशिव जिल्ह्यात सध्या तापाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.वाढत्या तापाच्या रुग्णांमध्ये डेंग्यू, मलेरियासह अन्य कीटकजन्य आजार उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिक,शाळा- महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांसाठी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.घर आणि परिसरात डासांची पैदास होणार नाही याची खबरदारी घेण्याबरोबरच ताप दोन दिवसांपेक्षा अधिक काळ राहिल्यास तातडीने शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तापाकडे केवळ ऋतुबदलाचा परिणाम म्हणून दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेणे महत्त्वाचे आहे.घरातील एखाद्या व्यक्तीला ताप आल्यास त्याची योग्य काळजी घेण्याबरोबरच घरापासून शाळा,महाविद्यालय आणि कार्यालयापर्यंत स्वच्छता राखल्यास आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यास मोठी मदत होऊ शकते. यासाठी आरोग्य विभागाने विविध स्तरांवर घ्यावयाच्या खबरदारीची सविस्तर रूपरेषा दिली आहे.

आठवड्यातून एक दिवस पाण्याची भांडी पूर्ण कोरडी करा

नागरिकांनी सर्वप्रथम डासांची पैदास होणारी ठिकाणे नष्ट करण्यावर भर द्यावा.घराभोवती कुठेही पाणी साचू देऊ नये.कुलर, पाण्याच्या टाक्या आणि कुंड्यांखालील ट्रे आठवड्यातून एकदा पूर्ण रिकामे करून वाळवावेत.अशा पद्धतीने नियमित ‘कोरडा दिवस’ पाळावा.डासांच्या चाव्यापासून वैयक्तिक संरक्षणासाठी अंग पूर्णपणे झाकले जाईल असे कपडे वापरावेत.रात्री तसेच सकाळच्या वेळी डास प्रतिबंधक क्रीम किंवा मलम लावावे अथवा मच्छरदाणीचा वापर करावा.पिण्यासाठी स्वच्छ, गाळलेले आणि उकळलेले पाणी वापरावे.शिळे तसेच उघड्यावर ठेवलेले अन्नपदार्थ खाणे टाळावे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यासाठी व्हिटॅमिन-सीयुक्त आहार,फळे आणि पाणी, नारळपाणी,लिंबूपाणी यांसारखे भरपूर द्रवपदार्थ घ्यावेत.पुरेशी विश्रांतीही घ्यावी.

दोन दिवसांपेक्षा अधिक ताप- तपासणी करा

ताप आल्यानंतर स्वतःच्या मनाने औषधे घेणे टाळावे.डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ‘पॅरासिटामॉल’ व्यतिरिक्त अस्पिरिन, आयब्युप्रोफेनसारख्या वेदनाशामक गोळ्या घेऊ नयेत.

दोन दिवसांपेक्षा अधिक काळ ताप कायम असल्यास तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय किंवा शासकीय रुग्णालयात जाऊन वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. आवश्यकतेनुसार डेंग्यू,मलेरिया अथवा विषाणुजन्य आजाराच्या निदानासाठी रक्ताची तपासणी करावी.अंगावर पुरळ येणे,सतत उलट्या होणे,हिरड्यांमधून रक्त येणे किंवा अत्यंत अशक्तपणा जाणवणे यांसारखी गंभीर लक्षणे दिसल्यास विलंब न करता रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करावे.

शाळा-महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे.शाळा,महाविद्यालये आणि अन्य शिक्षण संस्थांनी परिसर,मैदान आणि छतावर पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी.पाण्याच्या टाक्यांची झाकणे घट्ट बंद ठेवावीत.अंधाऱ्या आणि दमट जागांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश राहील याची काळजी घ्यावी.

डासांच्या चाव्यापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना पूर्ण बाह्यांचे शर्ट आणि लांब पँट घालण्याबाबत सूचना कराव्यात. वर्गशिक्षकांनी दररोज सकाळच्या परिपाठाच्या वेळी ताप असलेल्या किंवा आजारी दिसणाऱ्या विद्यार्थ्यांची पाहणी करावी आणि गरज असल्यास त्यांना उपचारासाठी संदर्भित करावे.

ताप किंवा संसर्गाची लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याबाबत पालकांनाही सूचित करावे.शाळेत प्रथमोपचार पेटी आणि थर्मामीटर सज्ज ठेवावा.विद्यार्थी अचानक आजारी पडल्यास पालकांना बोलावून त्याला वैद्यकीय उपचारासाठी पाठवावे.विद्यार्थ्याला ताप असल्यास योग्य विश्रांती घेण्याबाबत सूचना द्याव्यात.

परिपाठ अथवा तासिकेदरम्यान विद्यार्थ्यांना नियमित हात धुणे, वैयक्तिक आणि परिसर स्वच्छता राखणे तसेच डास प्रतिबंधाचे महत्त्व समजावून सांगून आरोग्यविषयक जनजागृती करावी.

आठ दिवसांनी पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता

शाळांमधील पाण्याच्या टाक्यांची दर आठ दिवसांनी स्वच्छता करावी. पिण्यासाठी आरओ किंवा उकळलेल्या पाण्याची व्यवस्था करावी आणि सर्व पाणीसाठे योग्य प्रकारे झाकून ठेवावेत. स्वच्छतागृहांमध्ये साबण आणि पाण्याचा पुरेसा पुरवठा असल्याची खात्री करावी.दररोज फिनाईल किंवा ब्लिचिंगसारख्या जंतुनाशकांचा वापर करून स्वच्छता राखावी.तालुका आरोग्य अधिकारी अथवा नगरपालिकेशी संपर्क साधून आवश्यकतेनुसार शाळेच्या परिसरात कीटकनाशक फवारणी आणि धुरीकरण (फॉगिंग) करून घ्यावे.सर्व विद्यार्थ्यांना वैयक्तिक आरोग्य व स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगावे.दररोज आंघोळ करणे, वारंवार हात धुणे आदी सवयी अंगीकारण्यासाठी त्यांचे प्रबोधन करावे.विद्यार्थ्यांना संतुलित आहाराचे महत्त्व पटवून द्यावे. मुलांच्या आहारामध्ये किमान एक फळ आणि संतुलित आहाराचा समावेश करण्यावर भर द्यावा.

वर्गखोल्यांच्या खिडक्यांना डासप्रतिरोधक जाळ्या बसवाव्यात.पाण्याच्या पाईपलाही जाळी बसवावी.प्रत्येक वर्गखोलीत पुरेसा सूर्यप्रकाश अथवा कृत्रिम प्रकाश राहील आणि हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande