नागपुरात डीजे, डॉल्बी आणि लेझर बीमवर पोलिसांचा कडक निर्बंध
उत्सवांमध्ये नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचे आदेश नागपूर, 03 सप्टेंबर (हिं.स.) : गणेशोत्सवासह आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ध्वनीप्रदूषण आणि लेझर बीमच्या वापराला आळा घालण्यासाठी नागपूर शहर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. पोलीस आयुक्त विश
संग्रहित


उत्सवांमध्ये नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचे आदेश

नागपूर, 03 सप्टेंबर (हिं.स.) : गणेशोत्सवासह आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ध्वनीप्रदूषण आणि लेझर बीमच्या वापराला आळा घालण्यासाठी नागपूर शहर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 164 अन्वये मनाई आदेश जारी केला असून, डीजे, डॉल्बी, प्लाझमा साऊंड सिस्टीम तसेच डोळ्यांना आणि वाहनचालकांना धोका निर्माण करणाऱ्या लेझर बीमच्या वापरावर निर्बंध घातले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या साऊंड सिस्टीम आणि त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मॉडिफाइड वाहनांवर जागेवरच कारवाई करून त्यांना सील करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हा आदेश 3 सप्टेंबर 2026 रोजी मध्यरात्रीपासून 1 नोव्हेंबर 2026 पर्यंत लागू राहणार आहे. या कालावधीत होणाऱ्या दहीहंडी, पोळा, तान्हा पोळा, ताजुल अवलिया छब्बीसवी, गणेशोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि दुर्गादेवी उत्सव यांसह विविध सणांच्या मिरवणुका व कार्यक्रमांना हे निर्बंध लागू राहतील.

पोलिसांच्या आदेशानुसार, टॉप, मिड आणि बेस अशा मल्टीस्पीकरच्या स्वरूपातील डॉल्बी सिस्टीम, प्लाझमा साऊंड सिस्टीम, प्रेशरमिड साऊंड सिस्टीम तसेच वाहनांमध्ये अनधिकृतपणे बदल करून थरावर थर साऊंड सिस्टीम उभारण्यासाठी केलेल्या फेरबदलांना प्रतिबंध करण्यात आला आहे. संबंधित सिस्टीम बाळगणारे मालक, धारक तसेच उत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी या साहित्याचा वापर करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

लेझर बीमवरही निर्बंध

मिरवणुका आणि उत्सवांमध्ये वापरण्यात येणाऱ्या लेझर बीम व बीम लाईटमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता असते. तसेच तीव्र प्रकाशामुळे नागरिकांच्या डोळ्यांना गंभीर अथवा कायमस्वरूपी इजा होण्याचा धोका असल्याने अशा उपकरणांवरही बंदी घालण्यात आली आहे.ध्वनीप्रदूषणासंदर्भातील न्यायालयीन निर्देश आणि मानवाधिकार आयोगाच्या सूचनांनंतरही काही ठिकाणी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात साऊंड सिस्टीमचा वापर होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे उत्सव मंडळे आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे.

नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित साऊंड सिस्टीम तसेच त्यासाठी वापरण्यात आलेली मॉडिफाइड वाहने जागेवरच जप्त करून सील करण्याची कारवाई केली जाऊ शकते.दरम्यान, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 आणि ध्वनीप्रदूषण नियंत्रण नियमांनुसार विहित ध्वनीमर्यादेत वापरल्या जाणाऱ्या सामान्य साऊंड सिस्टीमला या आदेशातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे निर्धारित नियमांचे पालन करून ध्वनीमर्यादेत साऊंड सिस्टीम वापरणाऱ्यांना या निर्बंधांचा थेट फटका बसणार नाही.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande