
वर्धा 03 सप्टेंबर (हिं.स.)
देवळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वायगाव (निपाणी) येथे रात्री दहा वाजल्यानंतरही विनापरवानगी कर्कश आवाजात भोंगे वाजविले जात असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली आहे. रात्रभर सुरू राहणाऱ्या या भोंग्यांच्या आवाजामुळे वृद्ध नागरिकांसह अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. सणासुदीचे दिवस सुरू झाले की, वायगावात घरोघरी विविध कारणांसाठी भोंगे लावण्याची जणू स्पर्धाच सुरू होते. दिवसभर मोठ्या आवाजात भोंगे वाजविले जात असतानाच रात्री दहा वाजल्यानंतरही कर्कश आवाज सुरूच राहत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी विद्यार्थ्यांचा अभ्यास, ज्येष्ठ नागरिकांची झोप तसेच आजारी व्यक्तींना याचा त्रास होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ध्वनिप्रदूषणाबाबत नियम असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत पोलिस प्रशासनाकडे अनेकदा निवेदने आणि तक्रारी करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. मात्र, संबंधित भोंगा चालकांवर ठोस कारवाई होत नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. रात्री दहा वाजल्यानंतर विनापरवानगी भोंगे वाजविणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, तसेच रात्रभर सुरू राहणाऱ्या कर्कश आवाजावर नियंत्रण आणावे, अशी मागणी वायगावातील विद्यार्थी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी