
लातूर, 03 सप्टेंबर, (हिं.स.)।
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने आज अहमदपूर येथे शांतता कमिटी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वराज्य मित्र मंडळ संचालित स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळाने गेल्या वर्षी केलेल्या उल्लेखनीय सामाजिक व विधायक कार्याची दखल घेत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष मजगे व या वर्षाचे अध्यक्ष धर्मराज चावरे यांचा गौरव करण्यात आला. हा सन्मान स्वराज्य गणेश मंडळास अत्यंत हृदयस्पर्शी आणि अभिमानाचा क्षण होता. गेल्या १७ वर्षांपासून स्वराज्य गणेश मंडळाच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्याचा लेखाजोखा संस्थापक अध्यक्ष संतोष मजगे उपस्थित मान्यवरांसमोर मांडला. समाजसेवा, सामाजिक बांधिलकी आणि विधायक उपक्रमांची ही वाटचाल यापुढेही अशीच सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.
यंदाचा गणेशोत्सव प्रशासनाने घालून दिलेल्या नियम, निर्बंध व नियमावलीचे काटेकोर पालन करून साजरा करू, असा शब्द प्रशासनाला दिला. तसेच मंडळासमोरील काही अडचणी व समस्या प्रशासनासमोर मांडल्या. त्याची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
गणेशोत्सव हा आपल्या सर्वांचा लाडका, श्रद्धेचा आणि उत्साहाचा सण आहे. हा उत्सव शिस्तीत, आनंदात, पर्यावरणपूरक पद्धतीने आणि सामाजिक सलोखा जपत साजरा व्हावा, याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
याप्रसंगी अरविंद रायबोले उपविभागीय पोलीस अधिकारी, उज्वला पांगरकर तहसीलदार, विनोदमैत्रेवार पोलीस निरीक्षक यांच्या सह मान्यवरांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis