
नाशिक, 03 सप्टेंबर (हिं.स.)।
- म्हाडाच्या भूखंड फसवणूक घोटाळ्याप्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सुरू असलेल्या चौकशीला आता कारवाईची जोड मिळाली आहे. या प्रकरणाच्या चौकशीत संबंधित महसूल कर्मचाऱ्यांची भूमिका समोर आल्यानंतर अप्पर तहसील कार्यालयाला निलंबनाचे आदेश प्राप्त झाले. त्यानुसार निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी तीन तलाठी आणि एका मंडल अधिकाऱ्याला निलंबन आदेशाची बजावणी केली. म्हाडाच्या भूखंडाशी संबंधित व्यवहारात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीनंतर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या चौकशीदरम्यान महसूल अभिलेख, भूखंडाशी संबंधित नोंदी तसेच संबंधित अधिका-यांच्या कामकाजाची तपासणी करण्यात येत आहे. त्यातून काही महसूल कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबत गंभीर बाबी निदर्शनास आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
निलंबित करण्यात आलेल्या निवासी तीन तलाठी आणि एका मंडल अधिकाऱ्याला उपजिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश बजावण्यात आले आहेत. या कारवाईमुळे म्हाडा भूखंड फसवणूकप्रकरणातील चौकशीला महत्त्व प्राप्त झाले असून, संबंधित प्रकरणात आणखी कोणाची भूमिका समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI