
नाशिक, 03 सप्टेंबर (हिं.स.)।
: गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश गुरुपौर्णिमा समितीच्या वतीने ‘॥ विश्वगुरु भारत ॥’ या संकल्पनेवर आधारित राज्यस्तरीय भव्य रांगोळी स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत ठक्कर डोम, ए.बी.बी. सर्कल, त्र्यंबक रोड, नाशिक येथे होणार आहे. शुक्रवारी (दि.४ ) सकाळी १०.३० वाजता होणार असल्याची माहिती उत्सव समितीचे प्रदेश संयोजक लक्ष्मण सावजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उदघाटन सोहळयास पालकमंत्री गिरीश महाजन, यांच्यासह पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. निवडक रांगोळ्यांचे प्रदर्शन दि. ४, ५ व ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि राष्ट्रीय सरचिटणीस अरविंद मेनन जी यांच्या प्रमुख संयोजनात राष्ट्रीय स्तरावर गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात तसेच राज्य संयोजक लक्ष्मण सावजी (नाशिक) यांच्या वतीने ही स्पर्धा होत आहे.
स्पर्धेचे दोन गट असून, पहिला गट इयत्ता ५ वी ते १० वी, तर दुसरा गट ११ वीपासून पुढे खुला गट आहे. भारतीय गुरु-शिष्य परंपरा, भारताची संरक्षण सिद्धता, भारतीय अस्मितेचे मानबिंदू, आत्मनिर्भर भारतासाठी पंचपरिवर्तन आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा महामंत्र - वंदे मातरम् हे स्पर्धेचे विषय आहेत. प्रवेश विनामूल्य असून पात्रता आवश्यक आहे. राष्ट्रभक्तीपर या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गुरुपौर्णिमा उत्सव संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. इच्छुकांनी : ७५८८१७९६४२ / ९४२२२५५८५१ या क्रमांकांवर संपर्क साधावा.यावेळी अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले, शहराध्यक्ष सुनील केदार, भाजपा कामगार आघाडीचे पदाधिकारी व्यकंटेश मोरे, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, शांताराम घंटे आदी उपस्थित होते.
२१ हजारांपर्यंत भरघोस बक्षिसे
विद्यार्थी गटातील कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी इयत्ता ५ वी ते १० वी गटात प्रथम क्रमांकासाठी ११ हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार रुपये. तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये, तर उत्तेजनार्थ २ हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. खुल्या गटात बक्षिसांची रक्कम आणखी आकर्षक असून, प्रथम क्रमांकासाठी तब्बल २१ हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी ११ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी ७ हजार रुपये, तर उत्तेजनार्थ ३ हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI