
सोलापूर, 03 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था पूर्ववत होईपर्यंत नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी दररोज टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सूचनेनुसार नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या पुढाकाराने ही व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अक्कलकोट शहरात दररोज सुमारे १२ ते १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. प्रत्येक टँकरची क्षमता सुमारे सहा हजार लिटर आहे. त्यानुसार शहरवासीयांना दररोज अंदाजे ७० ते ८० हजार लिटर पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.
पाणीपुरवठा व्यवस्था पूर्ववत होईपर्यंत नागरिकांना आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ही पर्यायी व्यवस्था सुरू ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, अक्कलकोट शहराचा पाणीपुरवठा अधिक सुरळीत आणि विनाअडथळा करण्यासाठी कुरनूर धरणातील जलउपसा यंत्रणेसाठी वाढीव क्षमतेची पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
जलशुद्धीकरण केंद्रातील प्रलंबित कामेही तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वाढीव यंत्रणा कार्यान्वित करून शहराचा पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड