कुकडी प्रकल्पात ऑगस्टअखेर विक्रमी ९३ टक्के पाणीसाठा
पुणे, 03 सप्टेंबर (हिं.स.)। कुकडी प्रकल्पाअंतर्गत असलेल्या धरणांमध्ये ऑगस्टअखेर तब्बल ९३ टक्के म्हणजेच २७.५९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मागील दहा वर्षांचा आढावा घेतला असता ऑगस्टअखेरचा हा कुकडी प्रकल्पातील आतापर्यंतचा उच्चांकी उपयुक्त पाणीसा
dam


पुणे, 03 सप्टेंबर (हिं.स.)।

कुकडी प्रकल्पाअंतर्गत असलेल्या धरणांमध्ये ऑगस्टअखेर तब्बल ९३ टक्के म्हणजेच २७.५९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मागील दहा वर्षांचा आढावा घेतला असता ऑगस्टअखेरचा हा कुकडी प्रकल्पातील आतापर्यंतचा उच्चांकी उपयुक्त पाणीसाठा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांतील सात तालुक्यांमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या पाणीसाठ्यामुळे रब्बी हंगामातील सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्राच्या सिंचनाची चिंता दूर झाली आहे. विशेषतः पावसाचे प्रमाण कमी राहिलेल्या कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी हा साठा महत्त्वाचा ठरणार आहे.

गेल्या तीन महिन्यांत जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला. त्याचा फायदा कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाणीसाठ्याला झाला आहे. दुसरीकडे, कुकडीच्या लाभक्षेत्रातील अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील पारनेर, कर्जत, करमाळा आणि श्रीगोंदा या कमी पावसाच्या भागांना या वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या या भागासाठी येडगाव धरणातून कुकडी डाव्या कालव्यात १,४०० क्युसेकने पाणी सोडण्याचे आवर्तन सुरू आहे.

कुकडी प्रकल्पाअंतर्गत येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे आणि डिंभे या पाच धरणांचा समावेश आहे. या धरणांची एकूण उपयुक्त पाणीसाठवण क्षमता सुमारे २९.६८० टीएमसी आहे.

या धरणांना जोडलेल्या सुमारे ६०० किलोमीटर लांबीच्या कालव्यांच्या माध्यमातून पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांतील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत आणि करमाळा या सात तालुक्यांतील शेतीला सिंचनाचा लाभ मिळतो.

ऑगस्टअखेर कुकडी प्रकल्पाच्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सरासरी ८८१.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, आगामी रब्बी हंगामासाठी सिंचनाचे नियोजन करण्यास मोठा आधार मिळाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande