
सोलापूर, 03 सप्टेंबर (हिं.स.)। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवली येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणावर अद्याप तोडगा न निघाल्याने मंगळवेढ्यातील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. सकल मराठा समाजाच्या बांधवांनी शहरातील दामाजी चौकात ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था तब्बल दोन तास विस्कळीत झाली.
दरम्यान, उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा न निघाल्यास ४ सप्टेंबर रोजी मंगळवेढा बंद ठेवण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी उभारलेल्या विविध आंदोलनांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याचे मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. या आंदोलनांमधून मंगळवेढ्यातील समाजबांधवांनी आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा दिला आहे. याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे २९ ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू आहे. मात्र, अद्याप शासनाकडून या प्रश्नावर तोडगा निघालेला नसल्याने मंगळवेढ्यातील मराठा समाजामध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड