
पुणे, 03 सप्टेंबर (हिं.स.)।पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) १५ टक्के सामाजिक आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील सदनिकांसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्जदारांच्या अडचणी लक्षात घेऊन आता मागील दोन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही एका वर्षाचे उत्पन्न ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या संदर्भातील जाहिरात २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्याच दिवशी दुपारी १२ वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
अर्जदारांना उत्पन्नाचा पुरावा म्हणून तहसीलदार कार्यालयाकडून प्राप्त उत्पन्नाचा दाखला किंवा आयकर विवरणपत्र ऑनलाइन पद्धतीने सादर करणे बंधनकारक आहे.यापूर्वी मंडळाने अर्जदारांना आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील उत्पन्नाचा दाखला किंवा आयकर विवरणपत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, अनेक अर्जदारांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे आयकर विवरणपत्र दाखल केले असले तरी त्याची पडताळणी अद्याप पूर्ण झालेली नसल्याने त्यांना ऑनलाइन अर्ज भरताना अडचणी येत होत्या.२०२५-२६ या आर्थिक वर्षाचे आयकर विवरणपत्र अलीकडेच दाखल करण्यात आल्याने आयकर विभागाकडून त्याचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी उपलब्ध होण्यास विलंब होत आहे. परिणामी, आवश्यक कागदपत्रे सादर करताना अनेक अर्जदारांसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या.ही बाब लक्षात घेऊन मंडळाने उत्पन्नाच्या निकषात शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे.
आता अर्जदारांना आर्थिक वर्ष २०२४-२५ किंवा २०२५-२६ यापैकी कोणत्याही एका वर्षाचा उत्पन्नाचा दाखला अथवा आयकर विवरणपत्र सादर करता येणार आहे. त्यामुळे आयकर विवरणपत्राच्या पडताळणीमुळे अर्ज प्रक्रिया रखडण्याची शक्यता कमी होणार आहे.अर्जदारांनी या बदलाची नोंद घेऊन त्यानुसार आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती शिवाजी आढळराव पाटील यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु