
पुणे, 03 सप्टेंबर (हिं.स.)।शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राचे (Fitness Certificate) नूतनीकरण करण्यासाठी दिवे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहे. शनिवार, ५ सप्टेंबर आणि रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी स्कूल बस, व्हॅनची तपासणी करून योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.
स्कूल बस चालक आणि वाहनमालकांनी आपल्या वाहनांसह दिवे प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपस्थित राहून आवश्यक तपासणी करून घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप खडसे यांनी केले आहे.
योग्यता प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी येणाऱ्या वाहनांमध्ये स्कूल बसना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित वाहनमालकांनी निर्धारित तारखेला वाहनांसह कार्यालयात उपस्थित राहून आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
पुणे जिल्ह्यातील स्कूल बस चालक, मालक तसेच संबंधित संघटनांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने वाहनांची आवश्यक तपासणी करून योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्याच्या निर्णयामुळे प्रलंबित स्कूल बसच्या फिटनेस प्रमाणपत्रांचे नूतनीकरण करण्यासाठी चालक व वाहनमालकांना अतिरिक्त संधी उपलब्ध होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु