दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात वाहतुकीत बदल
शहरात ४ आणि ५ सप्टेंबर रोजी विविध मार्गांवर निर्बंध वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पुणे, ३ सप्टेंबर (हिं.स.)। श्रीकृष्ण जयंती आणि दहीहंडी उत्सवानिमित्त पुणे शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार
दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात वाहतुकीत बदल


शहरात ४ आणि ५ सप्टेंबर रोजी विविध मार्गांवर निर्बंध वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

पुणे, ३ सप्टेंबर (हिं.स.)। श्रीकृष्ण जयंती आणि दहीहंडी उत्सवानिमित्त पुणे शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक शाखेने ४ आणि ५ सप्टेंबर रोजी परिस्थितीनुसार वाहतुकीत आवश्यक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

पुण्यात

४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत फडके हौद परिसरातील काही मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. जिजामाता चौक, सोन्या मारुती चौक, गणेश रोड तसेच फडके हौद परिसरातील वाहतूक परिस्थितीनुसार पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

तसेच, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून शिवरकर रोडवरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी संविधान चौक, साळुंखे विहार रोड आणि फ्लॉवर व्हॅली लेन या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे वाहतूक शाखेने कळविले आहे.

याशिवाय लष्कर, वारजे, समर्थ, बंडगार्डन आणि काळेपडळ वाहतूक विभागांच्या हद्दीतही गर्दीच्या परिस्थितीनुसार वाहतुकीचे नियमन करण्यात येणार आहे.

आवश्यकतेनुसार काही मार्गांवरील वाहतूक एकेरी करण्यात येईल, तर काही मार्ग पूर्णपणे बंद करून वाहने पर्यायी मार्गांवर वळविण्यात येणार आहेत.

दहीहंडी उत्सवादरम्यान नागरिकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, उपलब्ध पर्यायी मार्गांचा अवलंब करावा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त डॉ. संदिप भाजीभाकरे यांनी केले आहे.--------------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande