
देशभरात ३९४ दिव्यांग बालकांचे दत्तक विधान
पुणे, ३ सप्टेंबर (हिं.स.)। विशेष गरजा असलेल्या (दिव्यांग) बालकांचे दत्तक विधान आणि संस्थाबाह्य पुनर्वसन अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने पुण्यात पश्चिम विभागीय प्रादेशिक सल्लागार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय दत्तक साधन प्राधिकरण (सीएआरए), महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या सहकार्याने गुरुवारी, ३ सप्टेंबर २०२६ रोजी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
सीएआरएच्या २०२५ मधील दत्तक जनजागृती मोहिमेचा एक भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘विशेष गरजा असलेल्या बालकांचे संस्थाबाह्य पुनर्वसन’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाचा उद्देश प्रत्येक बालकाला सुरक्षित, प्रेमळ आणि कुटुंबाधारित वातावरणात वाढण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे.सीएआरएच्या विविध प्रयत्नांमुळे २०२५-२६ या आर्थिक वर्षात देशभरात ३९४ दिव्यांग बालकांचे दत्तक विधान झाले आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात ही संख्या ३१३ होती. त्यामुळे एका वर्षात दिव्यांग बालकांच्या दत्तक विधानाच्या संख्येत सुमारे २५ टक्क्यांची वाढ झाली आहे.पश्चिम विभागात महाराष्ट्र, गुजरात, गोवा तसेच दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. या विस्तृत विभागातील ७४ हून अधिक जिल्ह्यांमधील प्रतिनिधी कार्यशाळेत सहभागी होणार आहेत.
विशेष गरजा असलेल्या बालकांना संस्थांमध्ये दीर्घकाळ ठेवण्याऐवजी त्यांना कुटुंबाधारित संगोपन आणि पुनर्वसनाची संधी मिळावी, यावर कार्यशाळेत विशेष भर दिला जाणार आहे. दत्तक विधान प्रक्रिया आणि बाल संरक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर यावेळी चर्चा होणार आहे.बाल न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ मधील तरतुदी आणि तत्त्वांच्या अनुषंगाने बालकाचे सर्वोत्तम हित केंद्रस्थानी ठेवून दत्तक विधान आणि पुनर्वसन प्रक्रिया अधिक परिणामकारक करण्याबाबत कार्यशाळेत विचारविनिमय केला जाणार आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु