
प्राधान्य क्षेत्रासाठी १७ हजार २७० कोटींचे लक्ष्य
मागील वर्षाच्या तुलनेत कर्ज नियोजनात लक्षणीय वाढ
सोलापूर, ३ सप्टेंबर (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्याच्या सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी २६ हजार १७० कोटी रुपयांचा वार्षिक कर्ज योजना आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हा अग्रणी बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, यामध्ये प्राधान्य क्षेत्रासाठी १७ हजार २७० कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. मागील वर्षीच्या १५ हजार ३०० कोटी रुपयांच्या तुलनेत यंदाच्या कर्ज नियोजनात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यात ३१ मार्च २०२६ पर्यंत प्रत्यक्ष १६ हजार ५६५.२५ कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. हे निर्धारित लक्ष्याच्या १०८.२७ टक्के आहे. त्यामुळे कर्जवाटपाच्या उद्दिष्टापेक्षा अधिक कामगिरी झाल्याचे जिल्हा अग्रणी बँकेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.सन २०२६-२७ च्या आराखड्यात कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यात आले असून, एटीएल आणि एकूण कृषी क्षेत्र मिळून १० हजार ७७५.७५ कोटी रुपयांचे कर्जवाटप नियोजित करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या कर्ज नियोजनात कृषी क्षेत्राला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग अर्थात एमएसएमई क्षेत्रासाठी ५ हजार ५३० कोटी रुपयांचे कर्जवाटप प्रस्तावित करण्यात आले आहे. तर अन्य प्राधान्य क्षेत्रांसाठी ९६५ कोटी रुपयांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे प्राधान्य क्षेत्रासाठी एकूण १७ हजार २७० कोटी रुपयांचे कर्जवाटप नियोजित करण्यात आले आहे.दरम्यान, बिगर प्राधान्य क्षेत्रासाठी ८ हजार ९०० कोटी रुपयांचे कर्जवाटप प्रस्तावित आहे. प्राधान्य आणि बिगर प्राधान्य क्षेत्रातील या नियोजनातून सोलापूर जिल्ह्यासाठी सन २०२६-२७ मध्ये एकूण २६ हजार १७० कोटी रुपयांचा वार्षिक कर्ज योजना आराखडा निश्चित करण्यात आला आहे.ही माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ यांनी दिली.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड