
सोलापूर, 03 सप्टेंबर (हिं.स.)। केंद्र सरकारकडून सोलापूर महापालिकेला पहिल्या टप्प्यात २० ई-बस प्राप्त झाल्या असून, डिसेंबरअखेर आणखी २० ई-बस मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यातील २० बस शहर आणि ग्रामीण भागातील २४ मार्गांवर सुरू करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. ई-बससेवा १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची तयारी सुरू आहे.
ई-बससाठी उभारण्यात आलेल्या चार्जिंग स्टेशनजवळ वर्कशॉप आणि वॉशिंग सेंटरचे काम सध्या सुरू आहे. ही कामे पूर्ण करून १ ऑक्टोबरपासून बससेवा सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
नव्या ई-बसगाड्यांना प्रवासी वाहतुकीच्या रिक्षांमुळे अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेने आरटीओ आणि शहर वाहतूक पोलिसांशी पत्रव्यवहार केला आहे. ई-बसच्या सुरळीत वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे.
नव्या ई-बससाठी शहरात एकूण १२३ बस थांबे असणार आहेत. त्यापैकी ५० थांबे नवीन उभारण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात दोन नवीन बस थांबे उभारण्याचे नियोजन आहे. त्यामुळे महाराजांच्या पुतळ्यामागील बाजूस रिक्षा थांबणार नाहीत, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.
महिला हॉस्पिटलपासून होटगी रोडपर्यंतचा रस्ता नव्याने तयार झाल्याने या मार्गावर तीन नवीन बस थांबे उभारले जाणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड