
सोलापूर, ३ सप्टेंबर (हिं.स.)। श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होऊनही दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. बुधवारी बाजार समितीत कांद्याची १५७ ट्रक आवक झाली. एक नंबरच्या कांद्याला प्रति क्विंटल कमाल ६ हजार रुपयांचा दर मिळाला असून, येत्या काही दिवसांत कांद्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
बाजार समितीत बुधवारी एकूण १५ हजार ७०२ क्विंटल कांद्याची आवक झाली. एक नंबरच्या कांद्याला प्रति क्विंटल ६ हजार रुपये, तर सरासरी ३ हजार ३०० रुपयांचा दर मिळाला.सोलापूर, धाराशिव आणि पुणे जिल्ह्यांसह कर्नाटकातील काही भागांतून बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. मात्र, चालू हंगामात कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्रात घट झाली आहे. त्यातच चाळींमध्ये साठवून ठेवलेला कांदाही संपत आल्याने बाजारातील मागणी वाढली आहे.वाढती मागणी आणि उपलब्धतेतील घट यामुळे कांद्याच्या दराला चांगला आधार मिळत आहे. आवक मोठी असूनही दरात झालेली वाढ बाजारातील मागणीचे चित्र स्पष्ट करणारी आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कांद्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड