
पुणे, ३ सप्टेंबर (हिं.स.) : पुण्यात गणेशोत्सव आणि सार्वजनिक सणांदरम्यान डीजे तसेच लाऊडस्पीकरच्या मोठ्या आवाजाविरोधात भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी संवाद साधत असताना काही अज्ञात तरुणांनी बापट यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे. या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत घटनेचा निषेध केला. बापट यांच्याशी आपले सविस्तर बोलणे झाले असून, त्यांच्या मदतीसाठी वकील पाठवत असल्याचे सुळे यांनी सांगितले.या गलिच्छ कृतीचा मी जाहीर निषेध करते. माझं विद्यानंद बापट यांच्याशी सविस्तर बोलणं झालं आहे. मी माझ्या ओळखीतले वकील त्यांच्या मदतीला तातडीने पाठवत आहे,” अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.एखादी व्यक्ती आपले मत मांडत असेल, तर त्याला मारहाण करणे योग्य आहे का, असा सवालही सुळे यांनी उपस्थित केला. “एखादी व्यक्ती जर आपले मत मांडत असेल, तर तुम्ही त्याला येऊन मारहाण करणार का? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. या गलिच्छ प्रवृत्तीच्या मागे कुठली अदृश्य शक्ती आहे, याचा शोध घेतला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
पुण्यासह राज्यात सातत्याने अशा घटना घडत असल्याने महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचेही सुळे यांनी नमूद केले. सातत्याने अशा घटनांमुळे पुण्याची आणि राज्याची बदनामी होत आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.दरम्यान, विद्यानंद बापट यांच्यावर नेमक्या कोणत्या कारणातून हल्ला करण्यात आला आणि या घटनेमागे कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु