
नवी दिल्ली, 03 सप्टेंबर (हिं.स.)राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेता भालाफेकपटू यशवीर सिंगचा, दुखापतग्रस्त नीरज चोप्राच्या जागी जपानमध्ये होणाऱ्या आशियाई खेळांसाठीच्या भारतीय ॲथलेटिक्स संघात समावेश करण्यात आला आहे. लांब पल्ल्याचा धावपटू अभिषेक पाल याला कथित उत्तेजक द्रव्य सेवनाच्या उल्लंघनाबद्दल नाडा (NADA) कडून नोटीस बजावण्यात आल्यानंतर संघातून वगळण्यात आले आहे. भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने (AFI) लुधियाना येथे एका पत्रकार परिषदेत, १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या ऐची-नागोया आशियाई खेळांसाठी ७७ सदस्यीय भारतीय ॲथलेटिक्स संघाची घोषणा केली. राष्ट्रीय युवा चॅम्पियनशिप स्पर्धा देखील लुधियाना येथे आयोजित करण्यात येत आहेत.
पुरुष ११० मीटर अडथळा शर्यतीचा धावपटू तेजस शिरसे यालाही ग्लासगो येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल खेळांदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे संघातून वगळण्यात आले आहे.एएफआयचे अध्यक्ष बहादूर सिंग सग्गू म्हणाले की, सध्या दुखापतग्रस्त असलेल्या नीरज चोप्राच्या जागी आम्ही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेता यशवीरचा समावेश केला आहे. हा बदल दुखापतीमुळे झाला आहे, त्यामुळे यशवीरच्या समावेशात कोणतीही अडचण नव्हती. ते पुढे म्हणाले की , धावपटू अभिषेक पालला त्याच्या समस्यांमुळे संघातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे, आशियाई खेळांसाठी हा अंतिम संघ आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे