
तीन ठिकाणी छापे; १६ जणांवर गुन्हे दाखल, ४ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त
लातूर, ४ सप्टेंबर (हिं.स.) : नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक लातूर जिल्ह्यात रवाना केले होते. या पथकाने रेणापूर, गांधी चौक आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जुगार व मटका व्यवसायाविरोधात धडक कारवाई केली. तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण १६ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून २८ हजार ३५० रुपयांची रोकड, १० मोबाईल, सहा मोटारसायकली आणि संगणक साहित्य असा एकूण ४ लाख ४२ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रेणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे खरोळा येथील एका रिकाम्या प्लॉटमध्ये लिंबाच्या झाडाखाली जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध विशेष पथकाने कारवाई केली. या कारवाईत १० हजार ७०० रुपयांची रोकड, पाच मोबाईल आणि सहा मोटारसायकली असा एकूण ३ लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सात जणांविरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात गुरनं. ४५३/२०२६, कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर पथकाने गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंजगोलाई परिसरात दोन ठिकाणी मटका बुकीवर कारवाई केली.
या कारवाईत १० हजार ३५० रुपयांची रोकड, ४० हजार रुपयांचे चार मोबाईल आणि ५० हजार रुपयांचे संगणक साहित्य असा एकूण १ लाख ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणांत एकूण सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुरनं. ६२०/२०२६, कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये तसेच गुरनं. ६२१/२०२६, कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा सह कलम ४(१)(अ), ४(१)(ग) महाराष्ट्र लॉटऱ्या आणि बक्षीस स्पर्धा अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॉईल नगर येथे भंगार दुकानाच्या बाजूला असलेल्या देशमुख यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये मटका बुकीवर कारवाई करण्यात आली. यावेळी सात हजार ३०० रुपयांची रोकड आणि सात हजार रुपयांचा मोबाईल असा १४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुरनं. ४३८/२०२६, कलम १२ (अ), ४ महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपरोक्त तिन्ही कारवायांमध्ये विशेष पथकाने एकूण १६ आरोपींकडून २८ हजार ३५० रुपयांची रोकड, १० मोबाईल, सहा मोटारसायकली आणि संगणक साहित्य असा एकूण ४ लाख ४२ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध जुगार व मटका व्यवसायाविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
अवैध व्यवसायांची माहिती ‘खबर’ हेल्पलाइनवर द्या
नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलीस यंत्रणेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाच्या वतीने ‘खबर’ हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.
नागरिकांनी आपल्या परिसरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांची माहिती ९१५१००१००१ या मोबाईल क्रमांकावर देऊन ती थेट पोलिसांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis