
क्वेटा, 04 सप्टेंबर (हिं.स.)। बलुचिस्तानमध्ये गुरुवारी पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर मोठा हल्ला झाला. या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए)ने स्वीकारली आहे. बीएलएने दावा केला आहे की, या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे 25 जवान ठार झाले असून लष्कराच्या दोन वाहनांना आग लावण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, बीएलएच्या प्रवक्त्याने सांगितले की, त्यांच्या लढवय्यांनी जियारत क्रॉस येथे लष्कराच्या एका ताफ्याला लक्ष्य केले. त्यांनी वाहनांवर हल्ला करून त्यापैकी दोन वाहने नष्ट केली. त्यामध्ये लष्कराच्या एका ट्रकचाही समावेश होता. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने सुरुवातीला या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे 18 जवान ठार झाल्याचा दावा केला होता; मात्र नंतर मृतांचा आकडा वाढून 25 झाल्याचे सांगण्यात आले.
बीएलएने आपल्या अधिकृत मीडिया चॅनेलवर या हल्ल्याचा 1 मिनिट 11 सेकंदांचा व्हिडिओ ट्रेलरही जारी केला आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, या व्हिडिओमध्ये जियारत क्रॉस येथे झालेल्या हल्ल्याचे फुटेज दाखवण्यात आले आहे. बीएलएने जारी केलेल्या फुटेजमध्ये शस्त्रधारी लढवय्ये पाकिस्तानी लष्कराच्या जळत्या वाहनांजवळ दिसत आहेत. व्हिडिओमध्ये घटनास्थळी मृतदेहही दिसत आहेत. त्यासोबतच जप्त करण्यात आलेली शस्त्रेही दाखवण्यात आली आहेत. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने हा ट्रेलर जारी करताना म्हटले आहे की, संपूर्ण व्हिडिओ अद्याप जारी करण्यात आलेला नाही. तो नंतर प्रसिद्ध केला जाणार आहे.
बीएलएच्या निवेदनानुसार, दुसऱ्या एका घटनेत सुराबच्या हाजिका परिसरात संघटनेच्या ‘स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वाड’ने स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा रिमोटच्या साहाय्याने स्फोट घडवून आणला. बीएलएने दावा केला आहे की, या हल्ल्यात लष्कराचे एक वाहन नष्ट झाले असून सात जवान ठार झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode