
काठमांडू, 04 सप्टेंबर (हिं.स.)।नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुराला नऊ दिवस उलटल्यानंतर त्रिशूली येथील एका जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यातून किमान दोन कामगारांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे.या बचावकार्यामुळे बोगद्यात अद्याप काही लोक अडकले असण्याची आणि त्यांनाही जिवंत बाहेर काढता येण्याची आशा निर्माण झाली आहे.
लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल राजा राम बस्नेत यांनी या बचाव मोहिमेत दोन कामगारांना वाचवण्यात आल्याची पुष्टी केली. त्यानंतर काही वेळातच नेपाळचे खासदार राम न्यौपाने यांनीही बचावकार्याची छायाचित्रे फेसबुकवर पोस्ट केली.नेपाळमध्ये आलेल्या पुरानंतर जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात बचावकार्य सातत्याने सुरू आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नेपाळमधील 12 जलविद्युत प्रकल्पांमधील सुमारे 900 कामगार बेपत्ता आहेत. त्यापैकी जवळपास 500 कामगार बोगद्यांमध्ये अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
एका अहवालानुसार, बचावण्यात आलेल्या दोन कामगारांची ओळख कबीर महाराजन आणि संजय शाह अशी झाली आहे. संजय शाह हे नेपाळ इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी मध्ये मेकॅनिकल फोरमन म्हणून कार्यरत आहेत, तर कबीर महाराजन हे त्रिशूली-3A जलविद्युत प्रकल्पात सुपरवायझर आहेत.
नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, 26 ऑगस्ट रोजी भोटेकोशी नदीत अचानक आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 1,290 जणांचा मृत्यू झाला असून 5,000 हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत.दरम्यान, चीनने बुधवारी रात्री उशिरा दिलेल्या माहितीनुसार, सीमेपलीकडील तिबेट भागात 21 जणांचा मृत्यू झाला असून 541 लोक बेपत्ता आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode