रत्नागिरी : फणसवळ्याच्या जंगलात मध्यरात्री बेकायदा गोवंश वाहतूक करणारे दोघे जेरबंद
रत्नागिरी, 4 सप्टेंबर (हिं.स.) । गोवंश जनावरांची बेकायदा वाहतूक करणाऱ्या टोळीतील दोघांना रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी मध्यरात्री धाडसी कारवाई करून अटक केली. पोलिसांच्या अंगावर वाहन घालून पळण्याचा प्रयत्न आरोपींनी केला; मात्र वाहनाच्या पुढील चाकांमध
अटक लोगो


रत्नागिरी, 4 सप्टेंबर (हिं.स.) । गोवंश जनावरांची बेकायदा वाहतूक करणाऱ्या टोळीतील दोघांना रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी मध्यरात्री धाडसी कारवाई करून अटक केली.

पोलिसांच्या अंगावर वाहन घालून पळण्याचा प्रयत्न आरोपींनी केला; मात्र वाहनाच्या पुढील चाकांमध्ये बेशुद्धावस्थेतील गोवंश जनावर अडकल्यामुळे वाहन जागीच थांबले. त्यानंतर एका आरोपीला झटापट करून, तर दुसऱ्याला सुमारे सात तासांच्या शोधमोहिमेनंतर जंगलातून ताब्यात घेण्यात आले. अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

फणसवळे गावातील (ता. रत्नागिरी) जंगलमय परिसरात २० ऑगस्ट रोजी घडलेल्या गंभीर गुन्ह्याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात (गुन्हा रजिस्टर क्रमांक १६५/२०२६) भारतीय न्याय संहिता कलम ३२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरांक्षा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करण्यात आले होते.

पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलीस उपनिरीक्षक अभय तेली, पोलीस हवालदार संकेत महाडिक, सागर साळवी आणि स्वप्नील तेरवणकर हे काल मध्यरात्री सुमारे साडेबारा वाजता फणसवळे गावाच्या परिसरातील करबुडे फाटा ते फणसवळे मार्गावर गस्त घालत होते. त्या वेळी गुन्ह्याच्या घटनास्थळाजवळील जंगलात झाडीझुडपांच्या आड एक संशयास्पद चारचाकी वाहन उभे असल्याचे त्यांना दिसले.वाहनाची खात्री करण्यासाठी पोलीस पथक जवळ जाताच वाहनातील आरोपींनी पोलिसांच्या अंगावर वाहन घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मुख्य रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर शासकीय वाहन उभे असल्याने आरोपींना त्या दिशेने जाता आले नाही. त्यामुळे त्यांनी वाहन मागे घेऊन जंगलातील मार्गाने पलायन करण्याचा प्रयत्न केला.

याच वेळी वाहनाच्या पुढील चाकांमध्ये बेशुद्धावस्थेतील गोवंश जनावर अडकल्यामुळे वाहन पुढे जाऊ शकले नाही.

वाहन थांबताच आरोपी उतरून जंगलाच्या दिशेने पळू लागले. पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी धाडसाने झडप घातली आणि झटापटीनंतर मोहसीन बाबू कुरेशी (वय ३०, रा. मिरा रोड, मुंबई) याला ताब्यात घेतले. वाहनातील अन्य आरोपी अंधाराचा फायदा घेऊन जंगलात पळून गेले.

यानंतर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवून जंगल परिसरात ठिकठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली. सकाळी सुमारे साडेसात वाजता शहेनशाहा अब्दुल सत्तार शेख (वय ४८, रा. जनता सेवक सोसायटी, माहीम पश्चिम, मुंबई) याला जंगलातून ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपींकडे केलेल्या चौकशीत जंगलात पळालेल्या अन्य दोघांची नावे अस्लेम (रा. वांद्र-कुर्ला, मुंबई) आणि देवा (रा. विरार) असल्याची माहिती मिळाली. या दोघांचा कसून शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अटक केलेल्या आरोपींना पोलीस कोठडी मिळण्यासाठी रत्नागिरीतील न्यायालयात हजर करण्यात येत आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande