
अमरावती, 05 सप्टेंबर (हिं.स.)
अमरावती ग्रामीण पोलिसांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि गुन्हेगारीला समूळ नष्ट करण्यासाठी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कणा लाभणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ३१ पोलिस ठाण्यांमध्ये ‘एआय-बेस’ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. यामध्ये नाईट व्हिजन आणि वेगवान डेटा ट्रान्सफरसाठी ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी दिली. या हायटेक सुविधेमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून ग्रामीण भागातील सुरक्षेला एका नव्या उंचीवर नेले जाणार आहे.
ग्रामीण भागात सुरक्षिततेचे जाळे विणण्यासाठी पोलिसांना स्थानिक नागरिकांचीही मोठी साथ मिळाली आहे. सद्यस्थितीला ग्रामीण भागामध्ये नागरिकांच्या लोकसहभागातून आणि पुढाकारातून २,०३० खासगी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेत हे खासगी कॅमेरे ‘थर्ड आय’ (तिसरा डोळा) म्हणून मोठी भूमिका बजावत आहेत. या नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आता प्रत्येक पोलिस ठाण्याच्या परिसरात किमान १०० नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
२० हजारांहून अधिक कॅमेऱ्यांची गरुडझेप
संपूर्ण जिल्ह्याचा विचार केल्यास, सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या असलेल्या ३,३२८ लोकेशन्सची (ठिकाणांची) निवड करण्यात आली आहे. या सर्व भागांवर मिळून सध्या तब्बल २० हजार ३४३ सीसीटीव्ही कॅमेरे अहोरात्र कार्यरत आहेत. या अवाढव्य नेटवर्कमुळे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील गुन्हेगारी हालचालींवर पोलिसांची करडी नजर आहे.
रात्रीच्या अंधारातही गुन्हेगारांचा गेम ओव्हर!
डिसेंबरपर्यंत कार्यान्वित होणाऱ्या नव्या प्रणालीमध्ये ‘नाईट व्हिजन’ कॅमेऱ्यांचा समावेश असेल. यामुळे रात्रीच्या मिट्ट काळोखातही स्पष्ट चित्रीकरण शक्य होणार असून, हायस्पीड डेटासाठी संपूर्ण यंत्रणा ‘ऑप्टीकल फायबर’ने जोडली जाईल. एआय तंत्रज्ञानामुळे संशयास्पद हालचाली, गुन्हेगारांचे चेहरे आणि गाड्यांचे नंबर ओळखणे पोलिसांना अधिक सुलभ होणार आहे. ग्रामीण पोलिसांचे हे डिजिटल कवच अमरावतीकरांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी